राज ठाकरेंनी ठरवले तर अशक्य नाही...

By अतुल कुलकर्णी | Published: June 19, 2023 10:56 AM2023-06-19T10:56:20+5:302023-06-19T10:56:58+5:30

महिला बचत गटांच्या उत्पादनांना शिवाजी पार्कवर बाजारपेठ देऊन राज ठाकरे यांनी दीपोत्सव आणखी प्रज्वलित केला पाहिजे.

It is not impossible if Raj Thackeray decides... | राज ठाकरेंनी ठरवले तर अशक्य नाही...

राज ठाकरेंनी ठरवले तर अशक्य नाही...

googlenewsNext

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर,  १९४८ पासून प्रत्येकाला कामाचा हक्क मिळाला पाहिजे, अशी मागणी वि. स. पागे यांनी लावून धरली होती. १९४९ मध्ये त्यांनी स्वतःच्या शेतात शेतमजुरांना किती पैसे लागतात हे तपासण्यासाठी रोजगार हमी योजना राबवून पाहिली होती. पुढे राज्यभर कायदा होऊन ही योजना प्रत्यक्षात यायला १९७३ साल उजाडले. त्यावेळी ते विधान परिषदेचे सभापती होते. १९७२ ला महाराष्ट्रात दुष्काळ पडला, त्यावेळी लोकांच्या हाताला काम मिळाले पाहिजे, त्यांना जगण्यासाठी अन्न मिळाले पाहिजे म्हणून वि. स. पागे यांनी ही योजना आणली. दोन्ही सभागृहांनी एकमताने रोजगार हमीची योजना मंजूर केली. या योजनेचा मसुदा, जीआर, नियम, सगळे काही स्वतः पागे साहेबांनी लिहून काढले. शेतमजुरांसाठी त्यावेळी तो क्रांतिकारक निर्णय झाला. पुढे मनरेगा नावाने ही योजना केंद्र सरकारने स्वीकारली. या योजनेसाठी पैसा कुठून आणायचा असे ठरले तेव्हा त्यावेळी एसटी बसच्या तिकिटावर काही पैसे कर लावायचा निर्णयदेखील पागे साहेबांनी दिला.

वि. स. पागे यांचे चिरंजीव प्रकाश पागे यांनी देशात टोलची संकल्पना सगळ्यात पहिल्यांदा मांडली. मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे तयार होत होता. राज्यात भाजपचे सरकार आले होते. नितीन गडकरी यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग होता. हे काम रिलायन्स समूहाला द्यावे, अशी बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. मात्र गडकरींनी भांडून ही योजना आपला विभाग करेल असे सांगितले आणि मुंबई- पुणे एक्स्प्रेस-वे आकाराला आला. त्याचा खर्च कसा काढायचा हा मुद्दा आला तेव्हा प्रकाश पागे यांनी टोल लावून आपण पैसे वसूल करू शकतो, ही संकल्पना मांडली. चांगल्या हेतूने आलेल्या योजनेचे आज जे काही मातेरे झाले आहे तो भाग वेगळा. मात्र वि. स. पागे असो किंवा प्रकाश पागे, अशा लोकांनी महाराष्ट्राला व्हिजन दिले होते, ही वस्तुस्थिती आहे. झुणका भाकर केंद्राची योजना याच रोजगार हमीतून जन्माला आली होती. जी पुढे बाळासाहेब ठाकरे यांचे सरकार सत्तेवर आल्यानंतर अंमलात आली.

हे सगळे आठवण्याला कारण ठरले ते शालिनी ठाकरे यांनी सुरू केलेल्या कल्की फाउंडेशनमुळे. आज प्रत्येक पक्षाकडे लोक आपल्या हाताला काहीतरी काम मिळावे, याची मागणी करत येतात. कुठेतरी नोकरी लावून द्या. चार पैसे कसे मिळतील हे सांगा, अशी विचारणा सतत ते करत असतात. शालिनी ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काम करतात. त्यांच्याकडे मुंबईतल्या महिला सतत आम्हाला काहीतरी काम द्या, अशी मागणी करत येत होत्या. आम्हाला घरी बसून काम करता आले आणि त्यातून चार पैसे मिळाले तर ते हवे आहेत, अशी त्यांची मागणी होती. असे काम मुंबईत कसे द्यायचे, हा त्यांच्यापुढेही प्रश्न होता. त्यातून कल्की फाउंडेशनने एक वेगळा उद्योग हाती घेतला. कल्की हा विष्णूचा अवतार. हा अवतार ६४ कलांनी युक्त असेल, असेही पुराणात म्हटले आहे. कल्कीचा अर्थ ‘सशक्त आवाज’ असा होतो. हे फाऊंडेशन महिलांसाठी एक सशक्त आवाज बनू पाहत आहे. मसाले, वेगवेगळ्या प्रकारची पिठं आणि ड्राय ज्यूस यांची निर्मिती वेगवेगळ्या महिला बचत गटांकडून करून घेण्याची कल्पना महिलांच्या चर्चेतून पुढे आली.

राज ठाकरे यांनी या कल्पनेला ‘तडका’ दिला..! अर्थात तडका हे नाव दिले. महिन्याभरात प्रत्येकी सात महिलांचा एक असे ५० बचत गट मुंबईत सुरू झाले आहेत. या महिला वेगवेगळे पदार्थ बनविण्याचे काम करत आहेत. या महिलांना कच्चा माल फाउंडेशनच्या वतीने दिला जातो. बचत गटांकडून जे फायनल प्रॉडक्ट बनवले जाते, त्यातील ५० टक्के पदार्थ महिला बचत गटांनी आपापल्या विभागात स्वतः विकायचे. ५० टक्के तयार माल कल्की फाउंडेशन वेगवेगळ्या ठिकाणी विक्री करेल, असा या महिलांमध्ये करार झाला आहे. आपल्या हाताला काम मिळाले केवळ यावर समाधानी न राहता यातील काही महिलांनी बनविलेल्या पदार्थांचे पॅकेट वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन देणे सुरू केले आहे. हे साहित्य तुम्ही वापरा आणि यात काय सुधारणा करू शकतो हे सांगा, असा प्रस्ताव घेऊन या महिला मुंबईत फिरत आहेत.

राज ठाकरे यांनी दिवाळीला शिवाजी पार्कवर मोठ्या प्रमाणावर विद्युत रोषणाई करण्याचा प्रघात सुरू केला आहे. ती पाहण्यासाठी मुंबईच नव्हे तर राज्यभरातून लोक येतात. दिवाळीच्या निमित्ताने अशा महिला बचत गटांच्या उत्पादनांना शिवाजी पार्कवर बाजारपेठ देऊन हा दीपोत्सव आणखी प्रज्वलित केला पाहिजे. त्यामुळे स्वकष्टाने पैसे कमाविण्याची इच्छा असणाऱ्या महिलांच्या हातात स्वतःचे चार पैसे येतील. यातून पक्षहितही साध्य होईल आणि महिलांनाही स्वावलंबी करता येईल. राज ठाकरे यांनी ठरवले तर हे अशक्य नाही. यासाठी  बचत गटातल्या महिलांनी शिवतीर्थावर मोर्चा न्यायला हरकत नसावी.

 अनेकदा इच्छा असूनही अनेक महिला कोणत्याही राजकीय पक्षासोबत काम करायला फारशा उत्सुक नसतात. मात्र त्यांना अप्रत्यक्षपणे पक्षासोबत जोडण्याचे काम पडद्याआड शांतपणे मुंबईत सुरू आहे. कल्की फाउंडेशनसोबत डॉक्टर, वकील, इंजिनीअर, एमबीए झालेल्या अनेक महिला जोडल्या गेल्या आहेत. बचत गटांतून तयार होणारे साहित्य, त्याचा दर्जा आणि ते मुंबईभर जास्तीत जास्त ठिकाणी कसे विकले जाईल यासाठी त्या प्रोफेशनली सल्ले देत आहेत. कुठलाही गाजावाजा न करता..! 

Web Title: It is not impossible if Raj Thackeray decides...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.