मुंबई- राज्यसभेच्या निकालानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपाने काल जो घोडेबाजार केला, तो राज्यातील सर्व जनतेने पाहिला. काहींवर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणण्यात आला. काही ठिकाणी इतर काही व्यवहार आहे. ठीक आहे आज ते जिंकले असतील. पण आम्ही उद्या पाहू, असं संजय राऊत म्हणाले.
बहुजन विकास आघाडीचे तीन आमदारांची तीन मतं आम्हाला मिळाली नाहीत. करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे, लोह्याचे आमदार शामसुंदर शिंदे, अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी शिवसेनेला मतं दिली नाहीत, ज्यांनी शब्द देऊन दगाबाजी केली, त्यांची यादी आमच्याकडे आहे, असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊतांच्या या आरोपानंतर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी देखील भाजपावर टीका केली आहे. निवडणुकीसाठी पैशांचा आणि केंद्रीय यंत्रणांचा वापर गेम प्लॅनचा भाग होता. यामधून आम्हाला शिकण्याजोगे आहे. यातून आम्ही शिकून मोठी भरारी घेऊ, आत्ता आम्ही गेम प्लानमध्ये नापास झालो, असं नाना पटोले म्हणाले.
नाना पटोले पुढे म्हणाले की, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवारांच्या मनात काय हे माहित नाही. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक जिंकली आहे, असं म्हणत नाना पटोलेंनी अभिनंदनही केलं आहे. एमआयएमनं सर्वातआधी काँग्रेससोबत आहे, असं सांगितलं. त्यानंतर आम्ही महाविकास आघाडीसोबत असं म्हटलं. आम्ही काही त्यांची मतं मागितली नव्हती. तसेच ती मते कुठे गेली याबाबतही आम्हाला माहित नाही, असंही नाना पटोलेंनी सांगितलं.
दरम्यान, संजय राऊतांच्या या आरोपानंतर आता देवेंद्र भुयार यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहे. संजय राऊत हे काय ब्रह्मदेव आहेत का? हे ब्रह्मदेवापेक्षा मोठे आहेत असं वाटायला लागलंय. मतदान गोपनीय राहतं, मी दिलं नाही हे यांना कसं माहिती?, असा सवाल देवेंद्र भुयार यांनी उपस्थित केला आहे. मी कुठलाही दगाफटका केलेला नाही. मी महाविकास आघाडीलाच मतदान केलं. माझी मुख्यमंत्र्यांवर नाराजी आहे पण माझी वयक्तिक नाराजी नाही. मुख्यमंत्र्यांवर जी नाराजी होती जी मी उघडपणे व्यक्त केली, नाराजी उद्धव ठाकरेंपुढे नाही तर काय दाऊदसमोर मांडायची का? असा सवालही देवेंद्र भुयार यांनी उपस्थित केला आहे.