श्रीकांत जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : प्रत्येक धर्मात पाण्याला विशेष महत्त्व असून धर्माचे अधिष्ठान आहे. त्यामुळे सर्वच धार्मिक स्थळांवर जलस्रोताच्या जतन आणि संरक्षणाची चर्चा व्हायला हवी, असे ठाम मत जलयोद्धा उमाशंकर पांडे यांनी येथे व्यक्त केले. पाण्याच्या स्रोतांचे जतन व संवर्धन हवे. मात्र, ही केवळ सरकारची जबाबदारी नाही. सामाजिक भागीदारीतूनच ते शक्य होईल असा विश्वासही त्यांनी येथे व्यक्त केला.
जलयोद्धा उमाशंकर पांडे मुंबई दौऱ्यावर आहेत. येथील जलस्रोतांची पाहणी आणि अभ्यास ते करणार आहेत. याबाबत त्यांनी शुक्रवारी लोकमतला माहिती दिली. पुढे ते असेही म्हणाले की, झाडे म्हणतील ढगांना आम्ही रोखू, पाणी तुम्ही थांबवा. त्यासाठी बांधावर झाडे लावा. बघा गावाच्या गावे हिरवळीने न्हाऊन निघतील. त्यासाठी पाण्याच्या स्रोतांचे जतन संवर्धन हवे. मात्र ही केवळ सरकारची जबाबदारी नाही. सामाजिक भागीदारीतूनच ते शक्य आहे. बुदेलखंड येथील सामाजिक जलप्रयोगातून त्यांनी ते शक्य करून दाखवले आहे.
आधुनिकतेने पाण्याचा अतिरिक्त वापर वाढला पण पाणी स्रोतांचे जतन संवर्धन करणे हे आपण विसरलो. महाराष्ट्रात थोर संतांनी आणि विचारवंतांनी पाण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. पाण्याचा वापर आणि त्याचे जतन करणे हे शिकवले आहे. पाण्याला धर्मशास्त्राचे अधिष्ठान आहे. त्यामुळे इतर चर्चा करण्यापेक्षा येथील मंदिर, मज्जिद, गुरुद्वारा, चर्च अशा धर्मस्थळांमध्ये पाण्याच्या वापर आणि संवर्धनाबाबत चर्चा व्हायला हवी. झाडे लावा पाणी वाचवा हा आवाज सर्वत्र जायला हवा.
वाहने, रस्ते धुणे कमी व्हायला पाहिजे
- मुंबईमध्ये पाण्याचे जलस्रोत कमी आहेत. वाहने धुणे, रस्ते धुणे, स्विमिंग पूल यासाठी पाण्याचा जास्तीचा वापर करावा लागतो. - शिवाय नैसर्गिक पाणी स्रोतांपेक्षा बाटलीबंद पाण्याचा वापर जास्त होत आहे. तेव्हा काळजीपूर्वक पाण्याचा व्हावा. आणि जास्तीत जास्त पाणी जतन करण्यावर भर द्यावा कारण पाणी तुमच्या दारात पोहोचविणे ही जरी सरकार महापालिकेची जबाबदारी असली. - तरी विनाकारण पाण्याचा वाहता नळ बंद करणे हे आपले कर्तव्य आहे असा सल्लाही पांडे यांनी मुंबई करणारा दिला आहे.