Join us

मोठी बातमी! 'School Bus'मध्ये आता GPS बसवणं बंधनकारक; अप्पर पोलीस महासंचालकांच्या परिवहन विभागाला सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 3:17 PM

राज्यात स्कूल बस नियमावलीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश अप्पर पोलीस महासंचलकांनी (वाहतूक) परिवहन विभागाला दिल्या आहेत.

मुंबई-

राज्यात स्कूल बस नियमावलीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश अप्पर पोलीस महासंचलकांनी (वाहतूक) परिवहन विभागाला दिल्या आहेत. यानुसार राज्यात प्रत्येक 'स्कूलबस'मध्ये 'जीपीएस' बसवणं अनिवार्य असणार आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून स्कूल बसच्या नियमावलीची सक्तीनं अंमलबजावणी करण्याची विनंती मनसेच्या विद्यार्थी सेनेकडून करण्यात आली होती. याची दखल घेत पोलीस विभागानं स्कूल बसची नियमावली कडक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

स्कूल बसच्या बाबतीत आतापर्यंत अनेक प्रकार समोर आले आहेत. नुकतंच मुंबईथील पोदार शाळेची बस वेळेवर पोहोचू न शकल्यानं पालक चिंतेत पडले होते. विद्यार्थी वेळेवर घरी न पोहोचू शकल्यानं पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. त्यानंतर ड्रायव्हर रस्ता चुकल्यानं विलंब झाल्याचं निष्पन्न झालं आणि सर्व विद्यार्थी सुखरूप घरी पोहोचले. त्यानंतर पालकांचा जीव भांड्यात पडला होता. 

जूनमध्ये नवं शैक्षणिक वर्ष सुरू होत असून राज्यातील सर्व शाळांमध्ये सुरू असलेल्या बस सेवांमधील त्रुटी दूर करण्याची गरज असल्याची मागणी पालकांकडून केली जात आहे. याच गोष्टी लक्षात घेऊन आता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक स्कूलबसमध्ये जीपीएस असणं बंधनकारक करण्यात आलं आहे. यासोबतच बस चालक आणि मदतनिसांची पोलीस पडताळणी करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. 

टॅग्स :शाळाशिक्षणशिक्षण क्षेत्र