लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशातील ८० कोटी लोकांना मोफत धान्य देतो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात; पण हे तर काँग्रेसने केलेले काम आहे. अन्न सुरक्षा कायदा काँग्रेसने दिला, रेशन दुकानांची व्यवस्था काँग्रेस सरकारनेच उभी केली. देशात अन्नाचा तुटवडा असायचा; पण काँग्रेस सरकारने हरित क्रांती आणली, धवलक्रांती आणली म्हणूनच देशात धान्यांची गोदामे भरलेली आहेत, असे प्रतिपादन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी काँग्रेस वर्धापनदिनी केले.
काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त सोमय्या मैदान येथे भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले हाेते. राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच मुंबईत आलेल्या मल्लिकार्जुन खरगे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खरगे म्हणाले, आज लोकशाही संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे; पण दलित, महिला, वंचित, मागास, अल्पसंख्याक लोकांना मी मुंबई या ऐतिहासिक शहरातून संदेश देतो की, आपण सर्वांनी मिळून लोकशाही, संविधान वाचवायचे आहे, हे आपले कर्तव्य आहे.
पालिका निवडणुकीत स्वबळाचा नारा
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला स्वबळावर लढू द्या, अशी मागणी भाई जगताप यांनी जाहीरपणे खरगे यांच्याकडे केली. मुंबईच्या जडणघडणीत काँग्रेसचा खूप मोठा हात आहे. महापालिका निवडणूक काँग्रेस जिंकल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी व्यक्त केला.
महाराष्ट्रात चोरांचे सरकार
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार भाजपने षड्यंत्र करून पाडले. केंद्र सरकारनेही जोर लावून अनेक आमदारांमागे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या चौकशांचा ससेमिरा लावला. महाराष्ट्रातील भाजपचे सरकार हे चोरांचे सरकार आहे. आघाडीचे आमदार खरेदी करून सरकार बनवले. आज भाजपकडे तेच लोक आहेत ज्यांच्यावर भाजपनेच भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. लोकांना घाबरवून त्यांनी सत्ता मिळवली आहे; पण तुम्ही घाबरू नका, केंद्रातही खोटे बोलणाऱ्यांचेच सरकार आहे, अशी टीका खरगे यांनी यावेळी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"