Join us

घडवणारा शिल्पकारच पळवतात; सध्या अनेकांना मुख्यमंत्री व्हायचे आहे- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2023 6:26 AM

सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशाेक चव्हाण यांनी जागवल्या बाबूजींच्या आठवणी

मुंबई  : पदावर असताना माणूस म्हणून तुम्ही स्वत:ची कशी ओळख निर्माण केली ते महत्त्वाचे आहे. ज्यांनी घडविले तो शिल्पकारच पळवून नेण्याचे विचित्र वातावरण सध्या आहे. बाबूजी जवाहरलाल दर्डा यांची ‘संघर्षयात्री’ अशी ओळख आहे.  सुरत, गुवाहाटीला बस नेणारे खूप टूर्स, ट्रॅव्हल्सवाले झाले आहेत. या यात्रांमध्ये ‘संघर्ष’ शब्द विसरायला झाले आहे, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी येथे केले. यावेळी विविध मान्यवरांनी जवाहरलाल दर्डा उर्फ बाबूजींच्या विविध आठवणी, प्रसंग सांगत स्मृतींना उजाळा दिला. 

लोकमत’चे संस्थापक संपादक, स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगता सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त प्रल्हाद वामनराव पै, लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा यांची भाषणे झाली. तर लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता शेळगावकर यांनी केले. 

सध्या अनेकांना मुख्यमंत्री व्हायचे आहे

उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात सध्या अनेकांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. परंतु काँग्रेस पक्ष संकटात असताना जवाहरलाल दर्डा हे पक्षासोबत ठामपणे उभे राहिले हे त्यांचे मोठेपण. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून मी बाबूजींबद्दल ऐकले आहे. त्यांनी १९व्या वर्षी देशाकरिता तुरुंगवास भोगला. त्याग केला, हालअपेष्टा सहन केल्या म्हणून आपण आज सुखाने राहू शकतो. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याशी सूतराम संबंध नसलेल्या विचारसरणीने देशाचा ताबा घेण्याचा प्रयत्न आज सुरू केला आहे. काँग्रेसने देशात आणीबाणी लागू केली. अत्याचार केले. त्याचे समर्थन मी करणार नाही. त्यावेळी शिवसेनेने अनुशासन पर्व म्हणून आणीबाणीला पाठिंबा दिला होता. परंतु आणीबाणी उठवल्यावर निवडणुका घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याच काँग्रेसने विरोधकांना प्रचाराला वाव दिला. पु. ल. देशपांडे, दुर्गाबाई भागवत प्रचाराकरिता मैदानात उतरले. परंतु सध्या देशात असे वातावरण आहे की, बोलायचेच नाही. कुणी बोलण्याकरिता तोंड उघडले तर त्याचे तोंड दाबले जाते. 

कौतुकाची अपेक्षा नाही, बदनाम का करता?

एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख व निवर्तल्याची तारीख यामध्ये एक रेष असते. ती रेष म्हणजे त्या माणसाने आयुष्यात केलेले कार्य असते. त्या व्यक्तीच्या आयुष्यातील कार्याची रेष पुढच्या पिढ्यांनी पुढे खेचायची असते. जवाहरलाल दर्डा यांना मुख्यमंत्रिपद सोडून सर्व खात्यांच्या मंत्रिपदाचा अनुभव होता; पण मला मुख्यमंत्रिपद सोडून कुठल्याच खात्याच्या मंत्रिपदाचा अनुभव नाही. कोरोनाकाळातील कामांचा भ्रष्टाचार जरूर शोधून काढा. परंतु कोरोना लढ्याच्या मुंबई मॉडेलचे जगाने कौतुक केले. कौतुक करायला मोठे मन लागते. तुमच्याकडून कौतुकाची अपेक्षा नाही. परंतु बदनाम का करता? जर तुम्हाला कोरोनाकाळातील भ्रष्टाचाराची चौकशी करायची आहे तर देशातील सर्व राज्यांनी केलेल्या खर्चाची तसेच पीएम केअर फंडाची चौकशी करा. यात किती पैसा आला, कुणी घेतला? कोरोना लढ्याला अपशकुन करणाऱ्या अपशकुनी मामांचा हिशेब करायलाच हवा. लोकमतने झोप उडविणाऱ्या बातम्या देण्यापेक्षा लोकांना जागे करणाऱ्या बातम्या द्याव्यात, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :उद्धव ठाकरेलोकमत