वेळेवर निकाल लावण्याचे काम विद्यापीठाचीच ‘परीक्षा’ पाहणारे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 12:31 PM2023-11-19T12:31:53+5:302023-11-19T12:32:13+5:30
अपुरे प्राध्यापक, विनाअनुदानित महाविद्यालयांचा वाढला भार
रेश्मा शिवडेकर
मुंबई : गेली १३ वर्षे रखडलेली प्राध्यापकांची भरती, विनाअनुदानित महाविद्यालयांमुळे वाढलेला विद्यार्थ्यांचा भार यामुळे परीक्षेचे मूल्यांकन वेळेत पूर्ण करून निकाल लावणे मुंबई विद्यापीठाचीच ‘परीक्षा’ घेणारे ठरत आहे. मूल्यांकनाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी गेली चार-पाच वर्षे विद्यार्थी संख्येच्या दीडपट उत्तरपत्रिका तपासण्याची जबाबदारी विद्यापीठ महाविद्यालयांवर टाकत आले आहे.
यंदा सुटीच्या दिवशीही उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करण्याचे आदेश दिले आहेत. ६०हून अधिक अनुदानित महाविद्यालयांनी स्वायत्तता मिळविली आहे. त्यांनी परीक्षेचे काम करणे अभिप्रेत आहे. मात्र, स्वायत्त महाविद्यालयांचे आणि विद्यापीठाचे परीक्षा-सुट्या यांचे वेळापत्रक जुळत नाही. परिणामी या प्राध्यापकांना विद्यापीठाच्या कामात सहभागी होण्यात अडचणी येतात, असे एका प्राध्यापकांनी सांगितले.
nअभियांत्रिकीच्या भौतिकशास्त्र विषयाच्या २२ हजार उत्तरपत्रिका दरवर्षी तपासाव्या लागतात. त्यासाठी ४० परीक्षक उपलब्ध आहेत, असे बुक्टू संघटनेचे सचिव चंद्रशेखर कुलकर्णी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
nपरीक्षकांसाठीची तीन वर्षांच्या अध्यापनाची अट कमी करून एक वर्षावर आणण्यात आली. मात्र अडचण दूर झालेली नाही, असे व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य डॉ. बाळासाहेब साळवे यांनी सांगितले.
विद्यापीठाच्या विभागातच
६१ टक्के पदे रिक्त
nपदव्युत्तर विभागातच प्राध्यापकांची तब्बल ६१ टक्के पदे रिक्त आहेत. माहितीच्या अधिकारात मिळालेल्या आकडेवारीनुसार, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापकांसह ३६८ मंजूर पदांपैकी केवळ १४२ पदे भरली आहेत.
n८७ प्राध्यापकांपैकी केवळ १५ प्राध्यापक कार्यरत आहेत. २२ विभागांमध्ये तर पूर्णवेळ प्राध्यापकच नाही.
nसहयोगी प्राध्यापकांच्या १२१ पदांपैकी केवळ ४० भरलेली आहेत, तर १६० सहायक प्राध्यापकांच्या पदांपैकी ७३ पदे भरलेली आहेत.
मूल्यांकनाच्या कामात अडचणींचा डाेंगर
विद्यापीठाच्या सुमारे ९०० महाविद्यालयांपैकी १८३ अनुदानित आहेत. उर्वरित ७१७ विनाअनुदानित आहेत. या बहुतांश महाविद्यालयांचे प्राचार्य मान्यताप्राप्त नाहीत. तसेच, या महाविद्यालयांतील अध्यापक कंत्राटी वा अभ्यागत (व्हिजिटिंग) तत्त्वावर काम करत असतात. त्यांना मूल्यांकनाचे काम देणे शक्य होत नाही.