मुंबई - भाजपा आमदार राम कदम यांनीकंबल बाबांना बोलावून मतदारसंघातील विकलांग लोकांवर उपचार केल्याची घटनी समोर आली. त्यावरुन, अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आमदार कंबल बाबांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे, आमदार राम कदम अडचणीत आले आहेत. आता, याप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी लक्ष्य घातले असून थेट मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडे मागणी कारवाईची मागणी केली आहे.
राजस्थानमधील कंबल-बाबांना आमदार राम कदम यांनी मतदारसंघात आणले असून येथील विकलांग लोकांवर मोफत उपचार करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे या बाबांकडून उपचारासाठी नागरिकही मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. त्यामुळे, या बाबावर जादूटोणा विरोधी कायद्याखाली कारवाई करण्याची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मागणी केली होती. याच कंबल बाबामुळे राम कदमही गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. कारण, राम कदम यांनी कंबल बाबांना मुंबईत पाचारण केले असून त्यांनी स्वत:च्या सोशल मीडिया अकाऊंटवरुनही आवाहन केले आहे. याप्रकरणी आता, रुपाली चाकणकर यांनी एखाद्या बाबाला असा लोकप्रतिनीधींचा पाठिंबा मिळणे ही दुर्दैवी बाब असल्याचं त्यांनी म्हटलंय.
अर्धांग वायूसारखे आजार ठिक करण्याचा दावा करणाऱ्या कंबलवाले बाबाला आपल्या मतदारसंघात आणून आमदार राम कदम हे शिबिराचे आयोजन करत असल्याचे सोशल मीडियातून समजले. एक बाबा अंगावर घोंगडी टाकून आजार बरा करतो अशा अंधश्रद्धांना लोकप्रतिनिधीकडून पाठिंबा मिळणे दुर्दैवी असल्याचं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय. तसेच, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू असलेल्या पुरोगामी महाराष्ट्रात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी गृह विभागाने कठोर पावले उचलली पाहिजेत, अशी मागणीही त्यांनी ट्विटरवरुन मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडे केली आहे.
दरम्यान, कंबर आणि गुडघ्याचे दुघणे, विकलांग आजार किंवा पॅरेलिसिसचा आजार, अशांवर हे बाबा उपचार करत आहेत, अशा रुग्णांनी येथे येऊन उपचार घ्यावेत, असे आवाहनही राम कदम यांनी केले होते. त्यामुळे, उपचारासाठी मोठी गर्दी होताना दिसत आहे.
अंनिसकडून कारवाईची मागणी
कंबलबाबा हा भोंदूबाबा असल्याचे सांगत या भोंदूबाबावर पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा व पीडित व्यक्तींची अशी थट्टा थांबवण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आलीय. मुक्ता दाभोलकर,अण्णा कडलास्कर, मिलिंद देशमुख, राहुल थोरात, प्रशांत पोतदार, नंदिनी जाधव यांनी पोलिसांकडे ही मागणी केली आहे.