दीदींना 'असे' पाहणे अत्यंत वेदनादायी, डॉ. प्रतीत समदानी यांनी व्यक्त केल्या भावना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 12:53 PM2022-02-08T12:53:35+5:302022-02-08T12:53:53+5:30
लतादीदी आपल्यात नसणे हे अत्यंत दुःखद असून हे सर्वांचेच वैयक्तिक नुकसान आहे. मंगेशकर कुटुंबीयांना दीदींच्या प्रकृतीविषयी संपूर्ण जाणीव होती. मात्र, तरीही त्यांना ही बाब समोरून सांगणे हे क्लेशकारक होते असे डॉ. प्रतीत समदानी यांनी सांगितले.
मुंबई: लतादीदींची प्रकृती सुधारण्याची चिन्हे सुरुवातीला होती; पण काही काळाने त्यांचे अवयव निकामी होण्याची स्थिती आली. दीदींची ही बिघडलेली प्रकृती आणि त्या अवस्थेत दीदींना पाहणे अत्यंत वेदनादायी होते, अशी भावना ब्रीचकँडी रुग्णालयाचे डॉ. प्रतीत समदानी यांनी व्यक्त केली. दिवंगत भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर डॉ. समदानी हे उपचार करीत होते.
लतादीदी आपल्यात नसणे हे अत्यंत दुःखद असून हे सर्वांचेच वैयक्तिक नुकसान आहे. मंगेशकर कुटुंबीयांना दीदींच्या प्रकृतीविषयी संपूर्ण जाणीव होती. मात्र, तरीही त्यांना ही बाब समोरून सांगणे हे क्लेशकारक होते असे डॉ. प्रतीत समदानी यांनी सांगितले. दीदींचे हास्य अगदी प्रफुल्लित आणि अमूल्य असे मोनालिसा यांच्यासारखे होते. रुग्णालयातील डॉक्टरांसह अन्य पॅरावैद्यकीय कर्मचाऱ्यांशी दीदींचे अत्यंत आपुलकी अन् जिव्हाळ्याचे ऋणानुबंध होते. त्यांच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटावी यासाठी सतत रुग्णालयातील चमूही प्रयत्नशील असे. दीदी हसल्या की सर्वत्र चैतन्य पसरत असे, सर्व रुग्णालयीन कर्मचारीही उत्साह आणि सकारात्मकतेने दीदींकडे पाहत आणि त्यांच्या सेवेत मग्न व्हायचे. त्यामुळेच रुग्णालयातील प्रत्येकालाच दीदींचे देहरूपी नसणे हे वैयक्तिक नुकसान असल्यासारखे भासते आहे.
आदर्श, संयमी -
लतादीदी केवळ कलाकार म्हणून नव्हे तर माणूसही उत्तम होत्या. एक रुग्ण म्हणूनही त्या आदर्श ठरतील असे त्यांनी डॉक्टरांना सहकार्य केले. कधीही कोणत्याही उपचार प्रक्रियेला नकार दिला नाही, तर अत्यंत संयमशील अन् धीराने सर्व आरोग्याच्या आव्हानांना तोंड दिले.
- लतादीदींची पहिली भेट स्मरताना डॉक्टरांनी सांगितले, लतादीदींना तपासण्यासाठी त्यांना पाहायला मिळणार यासाठीच खूप उत्सुक होतो; पण ज्यावेळेस प्रत्यक्ष दीदींना पाहिले त्यावेळेस त्यांची प्रकृती बरी नसल्याचे समजले. तो क्षण अत्यंत भावनिक तितकाच आव्हानात्मक होता हेही जाणवले.
- दीदींची तब्येत ठीक नसतानाही त्या माझे निरीक्षण करीत होत्या. संवाद कसा साधतो, कसा बोलतो याकडे लक्ष होते. उपचार पुढे नेण्यासाठी दीदींना विश्वास वाटणे हीसुद्धा मोठी जबाबदारी होती; पण तो संपादन केल्यानंतर दीदी म्हणाल्या होत्या डॉक्टर काय करायचे ते करा काहीही अडचण नाही.
- दोन वर्षांहून अधिक काळ दीदींशी ऋणानुबंध होते. जेव्हा भेट शक्य नसायची त्यावेळेस त्या व्हिडिओ काॅलवर गप्पा मारायच्या. त्यावेळेस माझी आठ वर्षांची मुलगी इशान्वी व नेफ्रोलाॅजिस्ट असलेली पत्नी रुची यांच्याशी संवाद साधायच्या.
- दीदींनी इशान्वीला पत्रही पाठविले होते. लगान चित्रपटातील ‘ओ पालन हारे’ हे अत्यंत आवडते गाणे होते, हे गाणे गायले की दीदी इशान्वीचे खूप कौतुक करायच्या. हे गाणे यू-ट्यूब चॅनलवर अपलोड करण्यासाठी प्रोत्साहितही करायच्या.