शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबियांवर बोचरी टीका केली. ठाकरेंनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही बीकेसीवरील मेळाव्यातून सडेतोड उत्तर दिलं. 'बाप मुख्यमंत्री, कारटं खासदार आणि नातू आता नगरसेवक पदावर डोळे लावून बसला आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना उद्देशून केली. या टीकेवरुन आता शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं जात आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंसारख्या नेत्याने एकनाथ शिंदेंच्या नातवाचा उल्लेख करणं कमीपणाचं आहे. त्यांच्या नातवाचा भाषणात उल्लेख करणं चुकीचं आहे, असं सांगत उद्धव ठाकरे यांनी शब्द मागे घ्यावेत, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी अकोल्यात आले होते त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात केलेले भाषण ही भाजपाची स्क्रीप्ट होती असा आरोप धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमात वंचित बहूजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी केला होता त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंबेडकरांच्या भाषणाची स्क्रीप्ट कोण लिहते हे आधी पाहा अशा शब्दांत टोला लगावला आहे.
"सर्व कापूस खरेदी करू"
कापसाला बाजारपेठेत हमीभावापेक्षा जास्त भाव मिळतो. त्यामुळे शेतकरी कापूस तिकडे विकणे पसंत करतो, जर बाजारपेठेत भाव पडले तर कापसाला हमीभावापेक्षा जास्त दर देऊन सर्व कापूस खरेदी करू अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. हे सरकार शेतकऱ्यांचे सरकार असून गेल्या शंभर दिवसात आम्ही खूप चांगले निर्णय घेतले असल्याचा दावा त्यांनी केला.
"आदिपुरुषची माहिती घेऊ द्या अन्यथा माझा आदिमानव व्हायचा"
आदिपुरुष चित्रपट येतोय एवढच मला माहीत आहे. त्यामध्ये काय आहे मला माहीत नाही. राम कदमांनी का विरोध केला. मनसेने का पाठींबा दिला याची माहिती मला नाही मला आधी आदिपुरूष बाबत माहिती घेऊन द्या मगच बोलता येईल नाहीतर माझाच आदिमानव व्हायचा अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली.
खासदार श्रीकांत शिंदे यांचं पत्र-
"एका दीड वर्षाच्या अजाण बाळाला आपल्या भाषणात खेचणं तुमच्या धगधगत्या हिंदुत्वात बसतं का?" असा सवाल ही विचारला आहे. तसेच उद्धवजी, ज्या डोळ्यांत फक्त आणि फक्त निरागसता भरलेली आहे, ज्या डोळ्यांतून केवळ आणि केवळ निर्मलता ओसंडून वाहाते आहे, असे डोळे खुर्चीकडे लागलेले आहेत, असं वक्तव्य करताना तुम्हाला काहीच वाटलं नाही? मुख्यमंत्री असताना स्वतःला ‘कुटुंबप्रमुख’ म्हणवत होतात ना? मग कुटुंबप्रमुख असा कोवळ्या जिवांचा बाजार मांडणारा असतो?" असं देखील श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.