Join us

एकनाथ शिंदेंना नेतेपदावरुन हटवणं चुकीचं; दीपक केसरकरांनी दिला उद्धव ठाकरेंना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2022 1:04 PM

उद्धव ठाकरेंच्या या कारवाईनंतर शिंदे गटातील शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई- पक्षाविरोधात बंड करून भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदेंविरोधात पक्षानं मोठी कारवाई केली आहे. एकनाथ शिंदे यांची पक्षनेतेपदावरून काढण्यात आलंय. पक्षविरोधी भूमिका घेतल्यानं त्यांच्यावर उद्धव ठाकरेंनी कारवाई केली आहे. 

तुम्ही पक्षविरोधी कारवाया करत आहात आणि स्वेच्छेने शिवसेनेचे सदस्यत्वही सोडले आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून माझ्याकडे असलेल्या अधिकारांचा वापर करून मी तुम्हाला पक्ष संघटनेतील शिवसेना नेते पदावरून काढून टाकत आहे, असे पत्र शुक्रवारी उद्धव ठाकरेंनी प्रसिद्ध केले होते. त्यांनंतर आज दीपक केसरकर यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.   

उद्धव ठाकरेंच्या या कारवाईनंतर शिंदे गटातील शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदेंना नेतेपदावरुन हटवणं चुकीचं आहे. आम्ही कायदेशीर कारवाई करणार असल्याचं दीपक केसरकर यांनी सांगितलं. शिवसेनेनं अशी कृती करायला नको होती. शिवसेनेची ही कृती लोकशाहीला शोभणारी नाही. आजही आमच्या हातात शिवबंधन आहे, असं म्हणत दीपक केसरकर यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना इशारा दिला आहे. 

दरम्यान, एकनाथ शिंदे गटानं बंडखोरी करत भाजपासोबत राज्यात सरकार स्थापन केलं. शिंदे गटात शिवसेनेचे तब्बल ३७ आमदार सामील झाले. शिवसेनेच्या इतिहासातील आजवरचं हे सर्वात मोठं बंड मानलं जात आहे. यातच आता शिवसेनेच्या १९ खासदारांपैकी १२ खासदार देखील वेगळा विचार करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. शिवसेना खासदारांच्या एका गटानं शुक्रवारी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपल्या भावना व्यक्त केल्या आणि एकनाथ शिंदे यांच्याशी मध्यस्थी करण्याची विनंती केल्याची माहिती समोर आली आहे. 

खासदारांच्या गटावर परिणाम नाही- खासदार विनायक राऊत

बंडखोरीचा परिणाम शिवसेनेच्या खासदारांच्या गटावर झालेला नसल्याचा दावा खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. उस्मानाबादचे लोकसभा खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही आपण कायमस्वरुपी ठाकरेंसोबत असल्याचं म्हटलं आहे. तसंच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसारच १८ जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान करण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले. 

टॅग्स :उद्धव ठाकरेएकनाथ शिंदेशिवसेनादीपक केसरकर