चीनचं स्पेस स्टेशन उद्या मुंबईवर कोसळण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2018 11:08 AM2018-04-01T11:08:43+5:302018-04-01T11:08:43+5:30
अंतराळात चीनचं भरकटलेलं स्पेस स्टेशन सोमवारी मुंबईवर कोसळण्याची भीती व्यक्त केली जातेय. विशेष म्हणजे या स्टेशनच्या मार्गात महाराष्ट्रासह मुंबईचा बराचसा भाग येणार आहे.
मुंबई- अंतराळात चीनचं भरकटलेलं स्पेस स्टेशन सोमवारी मुंबईवर कोसळण्याची भीती व्यक्त केली जातेय. विशेष म्हणजे या स्टेशनच्या मार्गात महाराष्ट्रासह मुंबईचा बराचसा भाग येणार आहे. या चिनी स्पेस स्टेशनचं नाव टीयाँगाँग आहे. स्कूल बसच्या आकाराचं हे स्पेस स्टेशन असल्याची माहिती समोर आली आहे.
परंतु अंतराळातून पृथ्वीवर येताना त्याचे तुकडे होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तुकड्यांमध्ये विषारी वायू असल्यानं पृथ्वीवर कोसळल्यानंतर त्याला हात न लावण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या स्पेस स्टेशनच्या मार्गात महाराष्ट्रासह मुंबई, आंध्र प्रदेश, बंगालचा उपसागर आहे. परंतु स्पेस स्टेशन अतितीव्र वेगानं येत असल्यानं कुठे पडेल, याचा अंदाज बांधणं कठीण आहे. सोमवारी पहाटे चार वाजून 55 मिनिटांनी या स्पेस स्टेशननं पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर कुठे कोसळेल, याबाबत अंदाज व्यक्त करता येईल. त्या प्रमाणे या स्पेस स्टेशनचे तुकडे 200 ते 300 किलोमीटर परिसरात पसरण्याची शक्यताही वर्तवली जातेय.
2016मध्येच या स्पेस स्टेशनचा चीनशी असलेला संपर्क खंडित झाला होता. तेव्हापासून ते स्पेस स्टेशन अंतराळात फिरत आहे. चीन ते स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार होतं. परंतु त्या आधीच चीनचा स्पेस स्टेशनशी संपर्क तुटल्यानं ते आता अंतराळात फिरतं आहे. ब-याचदा पृथ्वीच्या कक्षात आल्यानंतर अशा वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडतात.