प्रकल्पांमधील विक्रीसाठी नसलेल्या फ्लॅटची माहिती ग्राहकांना देणे बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:06 AM2021-07-02T04:06:28+5:302021-07-02T04:06:28+5:30
मुंबई : बांधकाम व्यावसायिकांना आता पुनर्वसन व आरक्षित सदनिका सोडून इमारतीमधील विक्रीसाठी नसलेल्या फ्लॅटची माहिती देखील उघड करावी लागणार ...
मुंबई : बांधकाम व्यावसायिकांना आता पुनर्वसन व आरक्षित सदनिका सोडून इमारतीमधील विक्रीसाठी नसलेल्या फ्लॅटची माहिती देखील उघड करावी लागणार आहे. महारेरातर्फे बांधकाम व्यावसायिकांना माहिती जाहीर करण्यास सांगितले आहे. महारेराने ९ एप्रिलच्या परिपत्रकात प्रवर्तकांना प्रकल्पामध्ये इमारतीनुसार विक्री केलेली बुकिंग यादी जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. आधीच्या परिपत्रकात महारेरा नियम २०१७ च्या नियम अ आणि ब अन्वये प्रवर्तकांना विशिष्ट माहिती उघड करण्यास नमूद केले होते.
नियम ए आणि बी नुसार प्रवर्तकांना विकल्या गेलेल्या अपार्टमेंटची संख्या जाहीर करावी लागते आणि कार्पेट क्षेत्राच्या आधारे अपार्टमेंटचे आकार पुढे उघड केले असले तरीही अशा अपार्टमेंट्स इतर कोणत्या आधारावर विकल्या गेल्या आहेत, जसे की सुपर एरिया, सुपर बिल्ट अप क्षेत्र हे पाहावे लागते.
खरेदीदारास अधिक स्पष्टता मिळावी आणि फ्लॅटचे अनेक व्यवहार टाळण्यासाठी महारेराने प्रवर्तकांना चांगल्या स्वरूपात माहिती पुरविणे अनिवार्य केले आहे. विक्री होताच आवश्यक माहिती अद्ययावत करणे गरजेचे आहे. आता महारेराने जारी केलेल्या कोरिएंडियममधील स्वरूपात बदल करण्यात आला आहे. यामध्ये पूर्वी विक्री केलेल्या किंवा बुक झालेल्या फ्लॅटशी संबंधित माहितीची विचारणा करण्यात आली आहे.
तथापि, नवीन स्वरूपात आता विकल्या गेलेल्या, बुक केलेल्या, विक्री न झालेल्या, राखीव, पुनर्वसन आणि प्रकल्पातील अपार्टमेंट्स विक्रीसाठी नसलेल्या वस्तूंचा तपशील देखील विचारला जाणार आहे. या निर्णयामुळे संपूर्ण यंत्रणा व प्रकल्पात अधिक पारदर्शकता येऊ शकणार आहे. प्रकल्पातील विक्रीसाठी नसलेल्या फ्लॅटची माहिती घोषित करण्यासोबतच कार्पेट क्षेत्राची माहिती, तसेच सदनिका नोंदणीची तारीख सब रजिस्ट्रार ऑफिसकडेदेखील जाहीर करावी लागणार आहे.
अनेक विकसक विशिष्ट मजल्यावरील विशिष्ट फ्लॅट विकत नाहीत; परंतु आता घर खरेदीदार विकासकाने कोणता फ्लॅट विक्रीसाठी ठेवला नाही हे सहजपणे शोधू शकतात. यामुळे घर खरेदीदारास खरेदी करण्यासाठी अधिक पारदर्शकता येईल.