पाळीव श्वानांच्या मालकांना पूप स्कूपर ठेवणे बंधनकारक, अन्यथा पाचशे रुपये दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 02:06 AM2018-12-04T02:06:23+5:302018-12-04T02:06:31+5:30
पाळीव श्वानांनी रस्त्यावर प्रातर्विधी केल्यास त्याच्या मालकांना आतापर्यंत पाचशे रुपये दंड करण्यात होत होता.
मुंबई : पाळीव श्वानांनी रस्त्यावर प्रातर्विधी केल्यास त्याच्या मालकांना आतापर्यंत पाचशे रुपये दंड करण्यात होत होता. तरीही प्रामुख्याने दक्षिण मुंबईतील रस्ते पाळीव श्वानांच्या विष्ठेने अस्वच्छ होण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. त्यामुळे आपल्या पाळीव प्राण्याला फिरायला घेऊन येणाऱ्या व्यक्तींनी आपल्या सोबत ‘पूप स्कूपर’ ठेवणे महापालिकेने बंधनकारक केले आहे. अन्यथा प्राण्याच्या मालकाकडून पाचशे रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे.
सार्वजनिक ठिकाणे, रस्ते व पदपथ विशेषत: मरिन ड्राइव्ह परिसरात अनेक श्वान मालक किंवा संबंधित ‘केअर टेकर’ हे पाळीव प्राण्याला घेऊन फिरायला येत असतात. अशावेळी अनेकदा रस्त्यावर, पदपथावर व सार्वजनिक ठिकाणी हे प्राणी विष्ठा उत्सर्जन करतात. यामुळे सार्वजनिक ठिकाणे अस्वच्छ होण्यासोबतच आरोग्याचा धोकाही संभवतो. त्यामुळे या आठवड्यापासून विशेष जनजागृती मोहीम महापालिकेमार्फत राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेंतर्गत सार्वजनिक ठिकाणी आपल्या पाळीव प्राण्याला घेऊन फिरायला येणाºया व्यक्तींचे प्रबोधन केले जाणार आहे. या व्यक्तींनी आपल्या सोबत ‘पूप स्कूपर’ ठेवणे बंधनकारक असल्याचेही या जनजागृती मोहिमेत सांगण्यात येणार आहे.
मात्र पाळीव प्राण्यांना आणताना सोबत ‘पूप स्कूपर’ नसल्यास पाचशे रुपये दंडही वसूल करण्याचा निर्णय पालिका आयुक्त अजय मेहता यांनी बोलाविलेल्या आढावा बैठकीत सोमवारी घेण्यात आला.