मुंबई : रुग्णालयांमध्ये दैनंदिन वापरली जाणारी वैद्यकीय उपकरणे व साहित्याच्या किमतीवर नियंत्रण आणावे, तसेच त्या साहित्यावर कमाल किरकोळ विक्री किंमत छापणे (एमआरपी) बंधनकारक करावे, अशी मागणी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी केंद्र शासनाकडे वारंवार केली होती. त्यानंतर स्टेंटसह अन्य २२ वैद्यकीय उपकरणे व साहित्यांवर कमाल किरकोळ विक्री किंमत छापणे बंधनकारक असून या किमतीनुसारच त्याची विक्री करण्याच्या सूचना राष्ट्रीय औषध किंमत निर्धारण प्राधिकरणाने (नॅशनल फार्मास्युटिकल प्रायझिंग अॅथॉरिटी) उत्पादक कंपन्यांना केली आहे. यामध्ये हृदयरुग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या कॅथेटर, लेन्सेस, स्टेंट, रक्ताच्या पिशव्या आदींचा समावेश आहे.केंद्र शासनाच्या रसायने व खत मंत्रालयाच्या अखत्यारीतील नॅशनल फार्मास्युटिकल प्रायझिंग अॅथॉरिटी या संस्थेने वैद्यकीय उपकरणे व साधनांवरील कमाल किरकोळ किमतीसंदर्भात देशातील सर्व उत्पादक, वैद्यकीय संस्था, संघटना, सर्व राज्यांचे मुख्य सचिव, राज्य औषध नियंत्रक यांना यासंबंधीच्या सूचना पाठविल्या आहेत. या सूचनेमुळे आता या उपकरणाच्या कमाल छापील किमतीपेक्षा जास्त रक्कम रुणांकडून घेता येणार नाही.वैद्यकीय उपचारांमध्ये उपयुक्त असलेल्या कॅथेटर स्टेंट, निडल्स, सिरिंग्ज, ड्रग्स स्टेंट, कार्डियाक स्टेंट, सर्जिकल ड्रेसिंग, इन्ट्रा ओक्यूरल लेन्सेस आदी दैनंदिन वापराच्या वैद्यकीय साहित्यावर कमाल किंमत नमूद केली नसल्यामुळे रुग्णांना जादा रक्कम द्यावी लागत असल्याचे आढळून आले होते. या गोष्टीची दखल घेऊन अशा साहित्यावर कमाल विक्री किंमत छापणे (एमआरपी) बंधनकारक करावे, अशी मागणी केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांच्याकडे वारंवार केली होती. या मागणीची दखल घेऊन राष्ट्रीय औषध किंमत निर्धारण प्राधिकरणाने नुकतीच अधिसूचना प्रसिद्ध करून विविध २२ वैद्यकीय साहित्य/उपकरणे ही नॉन शेड्युल फॉरम्युलेशन प्रवर्गात आणली असून या साहित्यावर कमाल विक्री किंमत छापणे बंधनकारक केले आहे. (प्रतिनिधी)
स्टेंटसह अन्य वैद्यकीय साहित्यावर ‘एमआरपी’ छापणे बंधनकारक
By admin | Published: March 17, 2017 5:09 AM