रुग्णालये, रक्तपेढ्यांत ‘वैश्विक दात्यां’ची यादी लावणे बंधनकारक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 05:52 AM2018-12-08T05:52:48+5:302018-12-08T05:53:00+5:30
ऑक्टोबर महिन्यानंतर बऱ्याचदा राज्यभरात रक्तसाठ्याची चणचण भासते.
मुंबई : ऑक्टोबर महिन्यानंतर बऱ्याचदा राज्यभरात रक्तसाठ्याची चणचण भासते. त्यामुळेच बरेचदा स्वयंसेवी संस्था, रुग्णालये आणि रक्तपेढ्यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येते. मात्र तरीही कोणत्या रक्तपेढीत कुठल्या गटाचा रक्तसाठा उपलब्ध आहे, हेच अनेकदा रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना माहीत नसते. याच पार्श्वभूमीवर ही माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेने रुग्णालयांच्या आवारात दर्शनी भागात वैश्विक दात्यांची यादी लावण्याचा निर्णय घेतला आहे.
एखाद्या ठिकाणच्या लोकसंख्येच्या प्रमाणात तेथे एक टक्का रक्तदान व्हायला हवे, असा जागतिक आरोग्य संघटनेचा निकष आहे. रक्तदानाची गरज लक्षात घेता अनेक ठिकाणी रक्तादानाचे आयोजनही करण्यात येते. मात्र, तरीही बºयाचदा रुग्ण वा रुग्णांच्या नातेवाइकांना एखाद्या ठरावीक रक्तगटाच्या रक्तसाठ्यासाठी वणवण करावी लागते.
हे टाळण्यासाठीच आता परिषदेच्या निर्णयानुसार मोठी रुग्णालये व रक्तपेढ्यांमध्ये वैश्विक दात्यांची यादी लागलेली पाहायला मिळेल. त्यामुळे कोणत्या ठिकाणी किती रक्तसाठा आहे, हे लक्षात येईल. वेळेवर रक्तसाठा उपलब्ध होण्याचा मार्ग अधिक सुकर होईल, अशी आशा राज्य रक्त संक्रमण परिषदेचे डॉ. अरुण थोरात यांनी व्यक्त केली आहे.
>अंमलबजावणीवर परिषदेचे लक्ष
थोरात यांनी सांगितले की, दोन वर्षांपूर्वी पावसाळी अधिवेशनात याबाबत मागणी करण्यात आली होती. हाच संदर्भ लक्षात घेत राज्य रक्त संक्रमण परिषदेने हा सकारात्मक निर्णय घेतला आहे. राज्यातील मोठी रुग्णालये, ७३ सरकारी रक्तपेढ्या, १२ रेडक्रॉस सोसायट्यांच्या रक्तपेढ्या, याशिवाय अन्य रक्तपेढ्या या सर्वांसाठी हा निर्णय लागू आहे.
या निर्णयाच्या अंमलबजावणीवर परिषदेचे लक्ष असून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संबंधित संस्थांना परिषदेकडे पाठविणे सक्तीचे असल्याचेही डॉ. थोरात यांनी स्पष्ट केले.
या निर्णयामुळे रुग्णांच्या नातेवाइकांची रक्त मिळविण्यासाठी होणारी धावपळ बºयाच अंशी कमी होईल. शिवाय थॅलेसेमिया, हिमोफिलीया, सिकलेस आदी आजार असणाºया रुग्णांना अधिक रक्तपिशव्या मिळणे सोपे होणार आहे.