Join us

भट्टी इंधनाचा साठा करण्याची परवानगी असेल तेवढाच साठा करणे बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 2:36 AM

कोळसा, लाकूड, रॉकेल किंवा डिझेल यासारख्या इंधनांवर चालणाऱ्या भट्टीसाठी जेवढ्या प्रमाणात इंधनाचा साठा करण्याची परवानगी असेल तेवढ्याच प्रमाणात साठा करणे बंधनकारक आहे.

मुंबई : कोळसा, लाकूड, रॉकेल किंवा डिझेल यासारख्या इंधनांवर चालणाऱ्या भट्टीसाठी जेवढ्या प्रमाणात इंधनाचा साठा करण्याची परवानगी असेल तेवढ्याच प्रमाणात साठा करणे बंधनकारक आहे. त्यापेक्षा अधिक प्रमाणात साठा असल्यास त्यावर महापालिकेद्वारे जप्तीची व दंडात्मक कारवाई केली जाते. कोळशाचा साठा करताना तो धातूच्या व झाकण असलेल्या डब्यात करणे आवश्यक आहे. तर विद्युत भट्टीच्या बाबतीत विद्युत जोडणी ही परवानगीनुसार व आवश्यक तेवढ्याच दाब क्षमतेची असणे बंधनकारक आहे, अशी माहिती मुंबई महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.मुंबई महापालिका क्षेत्रात विविध व्यवसायांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या इंधनाचा वापर केला जातो. यामध्ये प्रामुख्याने विद्युत जोडणी व विद्युत उपकरणे, एल.पी.जी. सिलिंडर, पाइप्ड नॅचरल गॅस, रॉकेल, डिझेल, कोळसा वा लाकूड यासारख्या विविध प्रकारच्या इंधनाचा वापर केला जातो. या इंधन प्रकारानुसार संबंधितांनी अग्निसुरक्षेच्या दृष्टीने घ्यावयाच्या काळजीबाबत मुंबई महापालिका वारंवार आवाहन करत असते. कोळसा, लाकूड, रॉकेल, डिझेल किंवा इलेक्ट्रीक भट्टीची परवानगी देताना ज्या नियम व शर्तीच्या आधारे परवानगी दिली असेल त्या सर्व शर्तींचे काटेकोरपणे पालन करावे.भट्टीची परवानगी देताना सामान्यपणे एका ठिकाणी एकाच प्रकारच्या इंधनाचा वापर करण्याची परवानगी दिली जाते. तथापि, काही गरजांनुसार एकापेक्षा अधिक प्रकारच्या इंधनाचा वापर करण्याची परवानगी असल्यास त्याबाबत संबंधित अटी व शर्तींचे काटेकोरपणे व जबाबदारीने पालन करणे बंधनकारक आहे.विविध ज्वालाग्राही पदार्थांचा तसेच इतर सामानांचा साठादेखील दिलेल्या मर्यादेतच व नियमांनुसार असणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर भट्टीच्या जवळपास इलेक्ट्रीक वायरिंग व फिटिंग नसेल याची काळजी घेणेदेखील अतिशय आवश्यक आहे. लाकूड व कोळसा भट्टीचा वापर झाल्यानंतर त्यावर पाणी टाकून निखारे पूर्णपणे विझविणे आवश्यक आहे. रॉकेल-डिझेल भट्टीपर्यंत वाहून नेणाºया पाइपची नियमितपणे तपासणी करावी.तसेच अनेकदा या भट्टीमध्ये रॉकेल व डिझेल प्रवाहित करण्यासाठी विद्युत पंपाचा वापर केला जातो. या विद्युत पंपाच्या विद्युत जोडणीची व संबंधित सर्व बाबींची अधिकृत तंत्रज्ञांद्वारे नियमितपणे तपासणी करणे आवश्यक आहे. विद्युत भट्टीच्या बाबतीत सर्व विद्युत खटके (बटन/स्विच), वायरिंग, वायरिंगचे आवरण, विद्युत उपकरणे इत्यादी हे वीजदाब क्षमतेला अनुरूप व आयएसआय प्रमाणित असावेत. त्यांची जोडणी, फिटिंग इत्यादी कुशल व अधिकृत तंत्रज्ञांकडूनच करवून घ्यावी, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.चेंबूरनंतर लोअर परेलमध्ये आगमुंबई शहर आणि उपनगरात सातत्याने आगी लागण्याच्या घटना घडत असून, चेंबूर येथील आग शमते न शमते तोच शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास लोअर परळ येथे आॅर्बिट टेरेस या इमारतीचे नव्याने बांधकाम सुरू असताना ११ व्या मजल्यावर शॉर्ट सर्किट झाले आणि लाकूड साहित्याला आग लागली.तत्काळ घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या चार फायर इंजिनांच्या मदतीने सकाळी साडेआठ वाजता आग शमविण्यात आली. सुदैवाने घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र आगीच्या घटनांत सातत्याने वाढ होत असल्याने मुंबई महापालिकेसह अग्निशमन दलाने मुंबईकरांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :मुंबई