गुन्हा नोंदवण्यास विलंब झाला तरी चालेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 06:00 AM2017-08-18T06:00:08+5:302017-08-18T06:00:31+5:30
बलात्काराच्या केसेसमध्ये गुन्हा नोंदविण्यास विलंब झाला तरी चालू शकतो, परंतु या विलंबाचे स्पष्टीकरण समाधानकारक असले पाहिजे
मुंबई : बलात्काराच्या केसेसमध्ये गुन्हा नोंदविण्यास विलंब झाला तरी चालू शकतो, परंतु या विलंबाचे स्पष्टीकरण समाधानकारक असले पाहिजे. तसेच त्याचा खटल्याच्या निकालावर कोणताही परिणाम होता कामा नये, असे म्हणत उच्च न्यायालयाने मुंबईतील रहिवाशाला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरवले.
सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, अॅण्टॉप हिलचा रहिवासी मुरगन देवेंद्र याने २ आॅक्टोबर २००७ रोजी एका अल्पवयीन मुलीवर ती घरी एकटी असताना लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर मुलीने आई औषध म्हणून घेत असलेल्या १८ गोळ्या खाल्ल्या. त्यामुळे ती बेशुद्ध झाली. पालकांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले. ती ४ आॅक्टोबर रोजी शुद्धीवर आली आणि ५ आॅक्टोबर रोजी गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर देवेंद्रला अटक करण्यात आली.
२० डिसेंबर २००८ ला सत्र न्यायालयाने देवेंद्रला दोषी ठरवत सात वर्षांची सक्त कारावासाची शिक्षा ठोठावली. या निर्णयाविरुद्ध देवेंंद्रने उच्च न्यायालयात धाव घेतली. देवेंद्रच्या म्हणण्यानुसार, मुलीच्या कुटुंबीयांनी पूर्ववैमनस्यातून आपल्यावर हा आरोप केला आहे. गुन्हा विलंबाने नोंदवलेला आहे. त्यावर न्या. ए.एम. बदर यांनी गुन्हा नोंदवण्यास विलंब होणे ही बाब फार महत्त्वाची नाही. ‘पीडिता बेशुद्ध पडली. शुद्धीवर आल्यानंतरच ती घटनेची माहिती देऊ शकली. ही घटना समजल्यावर कुुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्यामुळे गुन्हा नोंदविण्यास विलंब झाला. त्यामुळे झालेल्या विलंबाचे समाधानकारक स्पष्टीकरण सरकारी वकिलांनी दिले आहे,’ असे म्हणत न्या. बदर यांनी देवेंद्रचे अपील निकाली काढले.
>युक्तिवाद फेटाळला
पूूर्ववैमनस्यातून आपल्यावर हा आरोप करण्यात आला आहे, हा देवेंद्रच्या वकिलांचा युक्तिवादही न्यायालयाने खोडला. ‘ही दुधारी तलवार आहे. याचिकाकर्त्यानेही पूर्ववैमनस्यातून मुलीवर लैंगिक अत्याचार केला, असे म्हटले जाऊ शकते,’ असे न्यायालयाने म्हटले.