आपत्कालीन स्थितीत परीक्षेपेक्षा शिक्षण सुरू राहणे महत्त्वाचे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 06:08 AM2020-06-12T06:08:28+5:302020-06-12T06:08:35+5:30

अंतिम परीक्षांवरून संघर्षाचे पडसाद : राज्यपालांसमोरच मुख्यमंत्र्यांचे ठाम प्रतिपादन

It is more important to continue learning than to take exams in case of emergency | आपत्कालीन स्थितीत परीक्षेपेक्षा शिक्षण सुरू राहणे महत्त्वाचे

आपत्कालीन स्थितीत परीक्षेपेक्षा शिक्षण सुरू राहणे महत्त्वाचे

Next

मुंबई : अंतिम वर्षांच्या परीक्षांवरून राज्यपाल आणि राज्य सरकारमधील संघर्षाचे पडसाद गुरुवारी मुंबईतील समूह विद्यापीठाच्या उद्घाटनप्रसंगी पाहायला मिळाले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या समोरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपत्कालीन स्थितीत परीक्षा नव्हे तर शिक्षण सुरू राहणे महत्त्वाचे आहे, असे विधान करत राज्यपालांवरच निशाणा साधला.

मुंबईतील के. सी. महाविद्यालय, एच. आर. वाणिज्य महाविद्यालय व बॉम्बे टीचर्स ट्रेनिंग कॉलेज यांचा समावेश असलेल्या हैदराबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट (एचएसएनसी) समूह विद्यापीठाचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री ठाकरेही उपस्थित होते. शिक्षण जीवनावश्यक गोष्ट आहे, असे सांगून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपत्कालीन परिस्थितीमध्येही विद्यार्थ्यांचे शिक्षण अविरत सुरूच राहिले पाहिजे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. नवे समूह विद्यापीठ पारंपरिक शिक्षणासोबत संगीत, नृत्य, कला इत्यादी विषयांचे शिक्षण घेण्याची संधी देणार असल्याबद्दल विद्यापीठाचे अभिनंदन करून जीवनात कला फार महत्त्वाची आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
तर, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या राजकीय विधानांकडे साफ दुर्लक्ष केले. मागील शतक संशोधनाचे होते. आता नावीन्यपूर्ण आविष्कार आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा काळ आला आहे. या दिशेने शिक्षण संस्थांनी कार्य करून सेंटर आॅफ एक्सलंस होण्याचा प्रयत्न करावा, असे राज्यपाल म्हणाले.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात भारताचा समृद्ध वारसा असलेली आध्यात्मिक बुद्धिमत्ताही तितकीच महत्त्वाची आहे. या आध्यात्मिक ज्ञानाच्या तसेच योगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वत: मध्ये असलेले पूर्णत्व अभिव्यक्त करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले.
आगामी काळाची गरज लक्षात घेता शिक्षण क्षेत्रात अमूलाग्र बदल करावे लागतील, असे सांगून सर जे. जे. स्कूल आॅफ आटर््सचे रूपांतर विद्यापीठात करण्याच्या दृष्टीने शासन विचार करीत असल्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले. एचएसएनसी क्लस्टर विद्यापीठ विद्यार्थ्यांना कौशल्याच्या माध्यमातून आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न करील असे निरंजन हिरानंदानी म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विद्यापीठाच्या संकेत स्थळाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी हैदराबाद सिंध महाविद्यालय मंडळाचे अध्यक्ष किशु मनसुखानी, विद्यापीठ संस्थांमधील प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

कलाकार असल्यामुळेच मुख्यमंत्री - उद्धव ठाकरे
आपण मुख्यमंत्री झालो नसतो, तर नक्कीच एक कलाकार झालो असतो; किंबहुना आपण कलाकार असल्यामुळेच मुख्यमंत्री आहोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी आपली कला शिकवावी - राज्यपाल
राज्याचे मुख्यमंत्री कलाकार आहेत. मला तर ते त्यांची कला शिकवत नाहीत. पण, कदाचित समूह विद्यापीठात येऊन तुम्हाला ते आपली कला शिकवतील, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले.

Web Title: It is more important to continue learning than to take exams in case of emergency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.