'नावापुढं साहेब लावणं सोप्प असतंय, लोकांच्या मनातील 'साहेब' होणं कोणाचंही काम नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 11:16 AM2020-08-19T11:16:24+5:302020-08-19T11:18:21+5:30
आमदार रोहित पवार यांनीही शरद पवारांच्या कोरोना टेस्टवरुन अनेकांना टोला लगावला आहे. फक्त नावापुढं साहेब लावणं सोप्पं असतंय, पण लोकांच्या मनातील साहेब होणं कोणाचंही काम नाही, असे रोहित पवार यांनी म्हटले.
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या बंगल्यातील आतापर्यंत एकूण १२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. यात २ सुरक्षा रक्षक, स्वयंपाकी, वाहन चालक अशाप्रकारे कोरोना रुग्णांचा समावेश आहे. शरद पवार हे पुढील काही दिवस कोणालाच भेटणार नाही असं सांगण्यात आलं आहे. शरद पवार यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्याने कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आमदार रोहित पवार यांनीही शरद पवारांच्या कोरोना टेस्टवरुन अनेकांना टोला लगावला आहे. फक्त नावापुढं साहेब लावणं सोप्पं असतंय, पण लोकांच्या मनातील साहेब होणं कोणाचंही काम नाही, असे रोहित पवार यांनी म्हटले.
शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवरील(Silvar Oak) यापूर्वी सहा जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामध्ये सुरक्षा रक्षकांसह स्वयंपाक करणाऱ्या महिलेचा समावेश आहे. यामुळे शरद पवारांची कोरोना चाचणी करण्यात आली. तिचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपेंनी दिली होती. कोरोनाची लागण झालेल्यांवर उपचार सुरू असून ते राहत असलेल्या परिसरात आलेल्या व्यक्तींच्या कोरोना चाचण्यादेखील करण्यात येणार असल्याचं टोपेंनी सांगितलं होतं. त्यानंतर आणखी ६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं कळालं आहे. यावरुन आमदार रोहित पवार यांनी स्वत:ला साहेब म्हणून घेणाऱ्या नेत्यांना टोला लगावला आहे.
''साहेबांचे काही सुरक्षारक्षक पॉझिटिव्ह निघाल्याने काल साहेबांना भेटलो. पण स्वतःपेक्षा सुरक्षा रक्षक, कोरोनाचं संकट, पूरस्थिती, कोरोना_वॉरियर्स व लोकांचीच अधिक काळजी करताना ते दिसले. फक्त नावापुढं साहेब लावणं सोप्पं असतंय. पण लोकांच्या मनातील साहेब होणं कोणाचंही काम नाही!, असे ट्विट रोहित यांनी शरद पवार यांच्या भेटीनंतर केलंय. रोहित पवार यांनी नेमका कोणाला टोला लगावलाय हे सांगता येणार नाही, पण जे कामाशिवाय स्वत:ला साहेब म्हणून घेतात, त्या सर्वांनाच ही चपराक आहे.
फक्त नावापुढं साहेब लावणं सोप्पं असतंय.
— आपला रोहित - AAPLA ROHIT (@RohitPawarSpeak) August 19, 2020
पण लोकांच्या मनातील साहेब होणं कोणाचंही काम नाही - आमदार @RRPSpeaks@mataonline@LoksattaLive@MiLOKMAT@TV9Marathi@zee24taasnews@abpmajhatv@SakalMediaNews@MaxMaharashtra@prabhatkhabar@JaiMaharashtraN@Policenama1https://t.co/7rn9iTg7dB
शरद पवार(Sharad Pawar) गेल्याच आठवड्यात कराडला गेले होते. या दौऱ्यानंतर मंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर शरद पवारांच्या सुरक्षा रक्षकांच्या कोरोना चाचण्यादेखील पॉझिटिव्ह आल्या. त्यामुळे शरद पवारांची कोरोना चाचणी करण्यात आली. ती निगेटिव्ह आली आहे. शरद पवारांच्या दोन स्वीय सचिवांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. कोरोनाची लागण झालेल्या सिल्व्हर ओकवरील कर्मचाऱ्यांना वरळीतील एनएससीआय डोममध्ये उपचारांसाठी ठेवण्यात आलं आहे. याशिवाय महापालिकेनं सिल्व्हर ओक परिसरात फिव्हर कॅम्पदेखील सुरू केला आहे. शरद पवार यांच्या कुटुंबीयांचीदेखील कोरोना चाचणी करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शरद पवारांनी त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. उद्या राष्ट्रवादीची बैठक होणार होती. मात्र शरद पवारांनी ती रद्द केली आहे.