Join us

महाराष्ट्र बजेट 2020: अर्थसंकल्प नव्हे, हे तर सभेतील भाषण - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2020 5:51 AM

बऱ्याचशा घोषणा या केंद्र सरकारकडून येणा-या निधीच्या भरवशावर करण्यात आल्या आहेत, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मुंबई : अर्थसंकल्पाच्या सादर करण्याच्या नावाखाली केवळ जाहीर सभेतील भाषण राज्याच्या विधानसभेत महाविकास आघाडीच्या अर्थमंत्र्यांनी केले. अर्थव्यवस्थेचे कुठलेही विश्लेषण, कुठलीही आकडेवारी त्यांनी सादर केली नाही, हे अतिशय दुर्दैवी आहे. बऱ्याचशा घोषणा या केंद्र सरकारकडून येणा-या निधीच्या भरवशावर करण्यात आल्या आहेत, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.ते म्हणाले की, जागतिक अर्थव्यवस्था, केंद्र सरकारवर दोषारोप करतानाच या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणा मात्र केंद्र सरकारच्या भरवशावर करण्यात आल्या आहेत. राज्याचा समतोल विकास समोर न ठेवता विशिष्ट भागांकडे निधी वळविण्यावरच भर दिसतो. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रावर अन्याय केला आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र हे तीन भाग जणू महाराष्ट्रात अस्तित्वातच नाहीत, असेच हा अर्थसंकल्प सांगतो.या भागांचा साधा नामोल्लेख करण्याचेसुद्धा सौजन्य दाखविले नाही. कोकणाचे नाव घेतले. पण, प्रत्यक्षात कोकणालाही काहीच दिलेले नाही. २० हजार कोटी रुपये खर्चाच्या मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेसाठी केवळ २०० कोटी रुपये देणे ही मराठवाड्याची घोर थट्टा अजित पवार यांनी केली आहे.कर्जमाफीत पीककर्जाच्या व्यतिरिक्त अन्य कोणतीही कर्जे घेण्यात आलेली नाहीत. त्यामुळे आता शेतकऱ्यांचा सात-बारा कधीही कोरा होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. शेतकरी कर्जमाफीत आमच्या ओटीएसच्या योजनेवर प्रचंड टीका त्या वेळी करण्यात आली होती. पण, आता तीच योजना पुन्हा सुरू करण्यात आली. जलयुक्त शिवारचे नाव बदलले जाईल, याची अपेक्षा होतीच. मुख्यमंत्री जलसंधारण योजना असे नाव देताना या योजनेला स्थगिती दिली नाही, यातच आनंद आहे. देशातील सर्वाधिक पायाभूत सुविधांचे २ लाख ६८ हजार कोटींचे प्रकल्प महाराष्ट्रात सुरू आहेत, हेही मान्य करण्यात आले आहे. पुणे रिंगरोड, पाणीपुरवठा योजना या सर्व योजना केंद्र सरकारच्या पैशांतून पूर्ण करण्यात येत असताना केंद्राच्या निधीचा उल्लेख करण्याचे सौजन्यही दाखविण्यात आलेले नाही, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसमहाराष्ट्र बजेट