Join us

'विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात घालणे व्यवहार्य नाही, अंतिम सत्रातील परीक्षा रद्द कराव्यात'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 6:22 PM

उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांचे युजीसीला पत्र ,सीईटी परीक्षा मात्र होणार 

मुंबई - अंतिम सत्रातील विद्यार्थ्याना ही ग्रेडिंगवर पदवी बहाल करण्यात यावी अशी मागणी करणारे पत्र उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज युजीसीला लिहिले आहे. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अंतिम सत्रातील ८ ते १० लाख विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात घालणे व्यवहार्य नसल्याचे त्यांनी म्हटले असून परीक्षा न घेता ग्रेडिंग सिस्टमसाठी परवानगी मागण्यात आली आहे. 

येत्या २ दिवसांत युजीसीकडून काही निर्णय न आल्यास राज्यातील विद्यापीठांचे कुलगुरू, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, मुख्य सचिव अजोय मेहता आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठकरे यांच्या उपस्थितीत पुढे काय करायचे याचा निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी साधलेल्या संवादात स्पष्ट केले. याशिवाय अंतिम सत्रातील परीक्षा सोडून राज्यातील सीईटी परीक्षा घेणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी सीईटी परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या. या परीक्षा तालुकास्तरावर होऊन , विद्यार्थ्याना केंद्रावर पोहचणे शक्य होत नसल्यास त्यांच्यासाठी व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले तरी वेळेनुसार यावर ही पुनर्विचार होईल असेही त्यांनी स्पष्ट केले. ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत , त्यांच्या शुल्काबाद्द्ल ही चर्चा सुरु असून ते पुढील सत्रात वापरता येईल का किंवा परत करता येईल का यावर विचार सुरु असल्याचे सामंत यांनी म्हटले. अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांची सुरक्षितता पाहून परीक्षाबाबत निर्णय घेतला जाईल असे आश्वासन त्यांनी शेवटी दिले 

टॅग्स :उदय सामंतशिक्षणविद्यापीठमुंबई