मुंबई - राज्यातील महाविकास आघाडीत काँग्रेस नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना काँग्रेसला डावलण्यात येतंय का? असा प्रश्न काँग्रेस नेत्यांना पडला आहे. महाजॉब्स पोर्टलवरुन युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी याबाबत ट्विट करुन थेट महाविकास आघाडी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा सत्यजीत तांबे यांनी ट्विट केलं आहे.
सत्यजित तांबे यांनी आपल्या पहिल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं की, महाजॉब्स ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे की, शिवसेना-राष्ट्रवादीची? आघाडीचे गठन होत असताना ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची व त्यातील शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही? हा माझ्या सारख्या सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. या ट्विटसोबत त्यांनी एक फोटो जोडलेला, यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांचा फोटो आहे, त्यात कुठेही काँग्रेस मंत्र्यांचा फोटो लावण्यात आला नाही, त्यामुळे काँग्रेसचे नेत्यांना राज्य सरकारमध्ये डावलण्यात येत असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली.
सत्यजीत तांबे यांच्या ट्विटनंतर शिवसेना नेते सुभाष देसाई आणि राष्ट्रवादीतील मंत्र्यांनी बाळासाहेब थोरात यांच्याशी संपर्क साधत चूक कबुल केली. त्यामुळे, हा प्रश्न आता संपला आहे, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. दरम्यान, सत्यजीत तांबेंनी आणखी एक ट्विट करुन आपला उद्देशच बोलून दाखवला.
सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नहीमेरी कोशिक है कि ये सूरत बदलनी चाहिए
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच बाळासाहेब थोरात आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात जवळपास १ तास चर्चा झाली, काँग्रेसचे मंत्री नाराज असल्याची चर्चा होती, तेव्हा बाळासाहेब थोरात आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती, या चर्चेनंतरही ज्या ठरलेल्या गोष्टी आहेत त्या होताना दिसत नाही अशी नाराजी असल्याचं सांगण्यात येत आहे. राजस्थानमध्ये सुरु असलेल्या राजकीय घडामोडींबाबतही चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांचे भाच्चे आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांना जाहीरपणे महाविकास आघाडी सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली.