Join us

उद्धव ठाकरे किती दिवस मुख्यमंत्री राहतील सांगता येत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जोराचे मतभेद सुरू असल्याने काँग्रेस पाठिंबा काढून घेण्याच्या तयारीत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पालघर : औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जोराचे मतभेद सुरू असल्याने काँग्रेस पाठिंबा काढून घेण्याच्या तयारीत असल्याने, उद्धव ठाकरे किती दिवस मुख्यमंत्री राहतील, हे सांगता येत नाही. या संधीची आम्ही वाटच बघत असून, देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुन्हा सरकार स्थापन करू, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रविवारी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले पालघरमध्ये आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी वरील उद्गार काढले. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नामांतराचा प्रश्न महत्त्वाचा नसून, कोणीही वाद करू नये. १९९५ मध्ये शिवसेनेची सत्ता होती. मागच्या आमच्या सरकारमध्येही ते सत्तेत सहभागी असताना, त्यांनी नामांतराबाबत काहीही निर्णय घेतला नाही. सध्या नामांतरावरून शिवसेना-काँग्रेसमध्ये जोराचे मतभेद सुरू असल्याने काँग्रेस कधीही आपला पाठिंबा काढून घेऊ शकते. त्यामुळे या संधीची आम्ही वाटच बघत असल्याने, आमच्या ११७ आमदारांसह देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन करण्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, असे आठवले यांनी सांगितले.

यूपीएमध्ये शरद पवारांना अध्यक्षपद द्यावे, या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मागणीला काँग्रेसमधून विरोध आहे. आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला विश्वासात घेतले जात नसल्याने काँग्रेसमध्ये तणाव असल्याचेही आठवले यांनी सांगितले.