मुंबई तापलेलीच
By admin | Published: March 29, 2017 06:20 AM2017-03-29T06:20:54+5:302017-03-29T06:20:54+5:30
हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिवशीही राज्यासह मुंबई तापलेलीच होती. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईकर सोसत असलेल्या झळा
मुंबई : हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिवशीही राज्यासह मुंबई तापलेलीच होती. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईकर सोसत असलेल्या झळा मंगळवारीही तीव्रतेने जाणवत होत्या. अकोला आणि चंद्रपूरचे तापमान ४३ अंश नोंदवण्यात आले आहे. तर मालेगाव, नांदेड आणि जळगावमध्ये ४२ तर मुंबईत ३८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद हवामान खात्याने केली आहे.
विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे, तर मराठवाड्याच्या संपूर्ण भागात, मध्य-महाराष्ट्र आणि कोकण-गोव्याच्या काही भागांत आणि विदर्भाच्या उर्वरित भागात तापमानाच्या सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. पुढील दोन दिवस उत्तर मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट असण्याची शक्यता हवमान खात्याने वर्तविली आहे.
गुजरातमध्ये निर्माण झालेल्या वातावरणाचा परिणाम मुंबईसह महाराष्ट्राच्या हवामानावर झाला आहे. गुजरातवर निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून राज्यात उष्ण वारे वाहू लागले आहेत. यामुळे हवेतील सापेक्ष आर्द्रता कमी झाली आहे. मुंबईला समुद्र जवळ असल्याने नेहमीच या वातावरणात आर्द्रता अधिक असते. पण मुंबईची हवादेखील कोरडी झाल्यामुळे मुंबईकरांना उष्णतेच्या झळा अधिक सोसाव्या लागत आहेत. हवामानाच्या अंदाजानुसार, अजून एक दिवस तापमान चाळिशीच्या घरात राहील. त्यानंतर मात्र तापमानात दोन अंशांची घट होईल. वातावरणात झालेल्या बदलांचा परिणाम आरोग्यावर होताना दिसत आहे. मुंबईकरांनी विशेष काळजी घ्यावी, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. (प्रतिनिधी)
आरोग्याची काळजी घ्या
डोकेदुखी, डोळे लाल होणे, अधिक घाम आल्यामुळे शरीरातील पाणी कमी होणे, चक्कर येणे असे त्रास मुंबईकरांना जाणवत आहेत.
अजून एक दिवस तापमान चाळिशीच्या घरात राहील. त्यानंतर मात्र तापमानात दोन अंशांची घट होईल.