Join us

परदेशी शिक्षण घेतले तरी भारताच्या भविष्यातील आव्हाने सोडवण्याची जबाबदारी आपलीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भारतात उच्च शिक्षण घेतले, येथेच काम केले तर आपले भविष्य भारतात सुरक्षित नाही, हा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : भारतात उच्च शिक्षण घेतले, येथेच काम केले तर आपले भविष्य भारतात सुरक्षित नाही, हा सर्वसामान्यांच्या मनात न्यूनगंड आहे. म्हणूनच परदेशी जाऊन शिक्षण घेण्याचा पर्याय अनेक जण निवडतात. आपला देश शिक्षणासाठी आपल्यावर आर्थिक गुंतवणूक करीत असतो, त्यामुळे परदेशी शिक्षण घेतले तरी भारताच्या भविष्यातील आव्हाने सोडवण्याची जबाबदारी आपलीच आहे ही जाणीव रुजायला हवी. येत्या वीस वर्षात ही स्थिती नक्की बदलेल, असा आशावाद ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. अरविंद रानडे यांनी व्यक्त केला.

मराठी विज्ञान परिषदेचा ५५ वा वर्धापन दिन २५ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी १.३० या वेळेत दूरस्थ संपर्कस्थापन प्रणालीद्वारे साजरा झाला. यावेळी ‘विज्ञानातून आत्मनिर्भर भारत’ या विषयावर डॉ. अरविंद रानडे यांनी मत मांडले. रानडे यांनी आत्मनिर्भरतेसाठी आवश्यक असणारी ‘स्वाभिमान, स्वावलंबन, स्वत्त्व, स्वीकार आणि संरक्षण’ ही पंचसूत्री मांडली. आपल्या देशातील उच्च शैक्षणिक संस्थांमधून दरवर्षी साधारण ५० हजार अभियंते तर साधारण ४५ हजार वैद्यकीय डॉक्टर तयार होत असल्यामुळे संशोधनमध्येही प्रगती होत आहे. भारत सरकारने २०२० साली राष्ट्रीय शिक्षण धोरणात अमूलाग्र बदल करून विज्ञान तंत्रज्ञानाबरोबरच नावीन्याची जोड दिली आहे.

सातारा येथील डॉ. सुधीर अण्णासाहेव कुंभारजी यांना या कार्यक्रमात सुधाकर उद्धवराव आठले विज्ञान प्रसार पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांनी वणवा निर्मूलन मोहीम, होळी बचाव आंदोलन, फटाकेमुक्त दिवाळी असे अनेक उपक्रम सातत्याने राबवले आहेत. महाराष्ट्रात फिरत्या प्रयोगशाळांमार्फत दरवर्षी २५,००० विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाबरोबरच शेतीविषयक जनजागृती आणि समाजसेवा केल्याबद्दल ठाणे येथील श्रीरंग रामचंद्र पिंपळीकर यांना मनोरमाबाई आपटे विज्ञान प्रसारक पुरस्कार वितरित करण्यात आला. शंख किडीच्या प्रादुर्भावावर आमांश विषनिर्मिती करणारे अमरावती येथील प्रतीक किशोर देशमुख यांना वसंतराव नाईक कृषी प्रतिष्ठान पुरस्कार प्रदान केला गेला. महिलांना सेंद्रिय शेती, तंत्रस्नेही व्यवस्थापनास उद्युक्त केल्याबद्दल दिशान्तर चिपळूण येथील संस्थेला बळीराजा-अण्णासाहेब शिंदे कृषी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पर्यावरणपूरक शेती करणारे औरंगाबाद येथील राजेंद्र आत्माराम नलावडे यांना प्रोत्साहनपर मराठी विज्ञान परिषद-ज्योती चापके पर्यावरणपूरक कृषी पुरस्कार प्रदान केला गेला. प्रा. माधव गाडगीळलिखित उत्क्रांती : एक महानाट्य या पुस्तकाला मराठी विज्ञान परिषद - नाशिक विज्ञान लेखक संघ पुरस्कार यावेळी देण्यात आला. डॉ. रघुनंदन वाघ यांच्या देणगीतून ‘मौले अर्थात मूलद्रव्ये’, ‘शोधांचा मागोवा’, ‘प्रवास सुखाचा’, ‘ओळख संगणकाची’ ही चार इ-पुस्तके या कार्यक्रमात प्रकाशित झाली असून ती पुस्तके संकेतस्थळावर विनामूल्य उपलब्ध आहेत. स्मिता पोतनीस यांनी त्यांच्या ‘ऐतिहासिक खेळ’, तर धनश्री करमरकर यांनी सुबोध जावडेकरलिखित तिसरा पर्याय या कथाकथनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

------------------------------------------