'तो नियोजित कट', शरद पवारांकडून जेएनयुतील भ्याड हल्ल्याचा निषेध'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 09:35 AM2020-01-06T09:35:47+5:302020-01-06T09:36:58+5:30
शरद पवार यांनी ट्विट करुन जेएनयुमधील हल्ला हा लोकशाहीविरोधी
नवी दिल्ली - दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये रविवारी (5 जानेवारी) विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटत आहेत. मुंबई, पुण्यासह देशाच्या विविध भागातील विद्यार्थ्यांनी आपला निषेध नोंदवला आहे. तर, देशभरातून समाजवादी आणि पुरोगामी नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे.
शरद पवार यांनी ट्विट करुन जेएनयुमधील हल्ला हा लोकशाहीविरोधी असून या हिंसक घटनेचा मी निषेध करतो. जेएनयुमधील विद्यार्थी आणि प्राध्यपकांवर करण्यात आलेला भ्याड हल्ला हा नियोजित कट असल्याचं पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. हिंसेचा वापर करणे म्हणजे लोकशाही मुल्यांचा आणि विचारांचा खून करण्यासारखे आहे, जे कधीही यशस्वी होणार नाही, असेही पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
जेएनयूतील हल्ल्यात 20 जण जखमी झाले असून जखमींमध्ये विद्यार्थी, संघटनांचे नेते आणि शिक्षकांचाही समावेश आहे. विद्यापीठाच्या अनेक दालनांची मोडतोड करण्यात आली आहे. जखमींना उपचारासाठी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सार्थक (31), कमलेश (30), सुरी कृष्णन (23), गौरव (24), शांभवी (21), वेलेंटिना (26), शिवम चौरसिया (27), मनीष जंगीड (25), शेषमणी साहू (22), आयुशी घोष (23), अमित परमेश्वरम (37), निखिल मॅथ्यू (24), आयुष सिंह (19), ऐश्वर्य प्रताप (25), शौकत (28), उज्ज्वल (22), दीपशिखा (19), सीमित (21), कामरान (20) असे 19 विद्यार्थी जखमी झाले असून, सुचरिता सेन (45) या जखमी शिक्षिकेलाही रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं आहे. या हल्ल्याचा अनेकांनी निषेध नोंदवला आहे.
दरम्यान, या हल्ल्याचे पडसात मुंबईतही दिसत असून जेएनयूमधील विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आयआयटी पवईतील विद्यार्थ्यांनी फ्लॅश मॉब केला. तर, काहींनी मध्यरात्रीच गेट वे ऑफ इंडियावर कँडल मार्च काढण्याचे आवाहन केले.
JNU students and professors were subjected to a cowardly but planned attack. I strongly condemn this undemocratic act of vandalism and violence. Use of violent means to suppress democratic values and thought will never succeed.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 5, 2020