Join us

मनाला भिडते ते लोकप्रिय साहित्य असते - रत्नाकर मतकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 3:09 AM

मनाला भिडते ते लोकप्रिय साहित्य असते, असे सांगत ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांनी शिष्ठप्रिय साहित्य आणि लोकप्रिय साहित्य या दोन प्रकाराचा उल्लेख केला.

मुंबई : मनाला भिडते ते लोकप्रिय साहित्य असते, असे सांगत ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांनी शिष्ठप्रिय साहित्य आणि लोकप्रिय साहित्य या दोन प्रकाराचा उल्लेख केला. लोकप्रिय साहित्यातल्या चांगला गुणांचा आणि ते लोकप्रिय का झाले? याचा नव्याने अभ्यास व्हायला हवा, संशोधन व्हायला हवे असेही मतकरी यांनी आग्रहाने नमूद केले.साहित्य अकादमी आणि क.जे. सोमय्या कला आणि वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच ‘लोकप्रिय साहित्य’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन विद्याविहार येथील क.जे. सोमय्या कला आणि वाणिज्य महाविद्यालयात करण्यात आले होते. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी, साहित्य अकादमी मुंबईचे क्षेत्रीय सचिव कृष्णा किंबहुने यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी मार्गदर्शनपर भाषणात मतकरी बोलत होते.मराठी समीक्षक प्रा. अविनाश सप्रे हे सांगली येथील महापुराच्या कारणामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. पण त्यांच्या बीजभाषणाचे वाचन कृष्णा किंबहुने यांनी केले. ज्यात कलात्मकता असते ते लोकप्रिय साहित्य असते. लोकप्रिय साहित्याला वांड्मय मूल्य असते. सौंदर्य मूल्यही असते, असे नमूद करत साहित्याचे समाजशास्त्र समजून घ्यायला पाहिजे हा विचार त्यांनी नमूद केला. लोकप्रिय साहित्य लोकांना आवडते, कारण कोणत्याही साहित्यामध्ये वाचक केंद्रस्थानी असतो, असेहीते म्हणाले.परिसंवादाच्या पहिल्या सत्राच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वीणा सानेकर होत्या. यात लेखक राजीव जोशी आणि डिंपल प्रकाशनचे अशोक मुळे सहभागी झाले होते. राजीव जोशी म्हणाले, लोकप्रिय साहित्याला अभिजात या प्रकारापासून दूर ठेवण्याची परंपरा आहे. लोकप्रिय होण्यासाठी काहीतरी घडणे अपेक्षित असते. अशोक मुळे म्हणाले, हलक्या दर्जाच्या साहित्याला लोकप्रिय साहित्य म्हणतात. पण ज्ञानेश्वरी तुकारामांचे साहित्य दर्जेदार आहे. आजही ते समाजाला मार्गदर्शक आहे. लोकप्रिय आहे.द्वितीय सत्राच्या अध्यक्षस्थानी मराठी साहित्यकार अशोक समेळ होते. मुंबई विद्यापीठाचे प्रा. गणेश चंदनशिवे हेदेखील यावेळी उपस्थित होते. अशोक समेळ म्हणाले, लिहायला सुरुवात करताना लेखका समोर फक्त मोकळे आभाळ आणि विचार असतो. त्यानंतर त्याचे संशोधन लेखनासाठी महत्त्वाचे असते. साहित्य आहे तिथे संशोधन असतेच. वाचनाने माणूस श्रीमंत होतो.

टॅग्स :मुंबईमराठी