मुंबई : महावितरणने वीजग्राहकांसाठी सर्व सेवा आॅनलाइन उपलब्ध करून दिल्या असून, सेवा सहज मिळाव्यात, या उद्देशातून ग्राहक व कर्मचारी यांना उपयुक्त असे चार अॅप उपलब्ध करून दिले आहेत. ग्राहकांसाठी असलेल्या ‘अॅप’मध्ये अनेक सुविधा असून, या अॅपच्या माध्यमातून रीडिंग घेऊन ते ग्राहकांना महावितरणकडे पाठवता येत आहे.‘अॅप’द्वारे रीडिंग घेऊन महावितरणला पाठवणारा राज्यातील पहिला वीजग्राहक भांडुप परिमंडळातील आहे. शंकर राऊत असे त्यांचे नाव आहे. राऊत हे महावितरणच्या ठाणे १ विभागांतर्गत येणाऱ्या कोपरी-ठाणे येथे राहतात. नुकतेच रीडिंगबाबत महावितरणकडून राज्यातील निवडक लोकांना त्यांचे मीटर रीडिंग उपलब्ध नसल्याचा संदेश पाठवण्यात आला होता. त्यानंतर, राऊत यांनी तत्काळ ‘अॅप’द्वारे रीडिंग घेऊन ते अपडेट केले. त्यामुळे ‘अॅप’द्वारे रीडिंग घेणारे ते राज्यातील पहिले वीजग्राहक ठरले आहेत. त्यामुळे त्यांना आता त्यांचे अचूक वीजबील मिळणार आहे.दरम्यान, अनेक वेळा ग्राहक घराबाहेर असतात, शिवाय काही कारणांमुळे अशा ग्राहकांचे रीडिंग घेणे शक्य होत नाही. अशा वेळी त्या ग्राहकांना एसएमएसद्वारे माहिती देऊन रीडिंग देण्याबाबत कळवण्यात येते. अशा ग्राहकांकडे महावितरणचे ‘मोबाइल अॅप’ असेल, तर ते आपले रीडिंग जमा करू शकतात. याकरिता ग्राहकांना दोन दिवसांचा अवधी दिला जातो. (प्रतिनिधी)
वीजग्राहकांना ‘अॅप’द्वारे रीडिंग घेणे शक्य
By admin | Published: September 12, 2016 4:06 AM