श्रीकांत चाळके- खेड चौपदरीकरणामुळे कोकण विकासाचा वेग वाढेल, असा विश्वास व्यक्त होत असला तरी तो कधी पूर्ण होणार, असा प्रश्न विचारला जात आहे. मुंबई - गोवा महामार्गावरील कोकण प्रांतात होत असलेले अपघात व दळणवळण अधिक सुलभ करण्यासाठी महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. मुंबई-गोवा हा महामार्ग १७व्या क्रमांकाचा आहे. आता याचे चौपदरीकरण होणार असल्याने मूळचा हा क्रमांक आता नष्ट होणार असून, त्याजागी ६६वा क्रमांक येणार असल्याचे महामार्ग विभागाकडून सांगण्यात आले आहे़ राष्ट्रीय मार्ग असल्याने या मार्गावर कोकणातील पनवेल ते इंदापूर आणि झाराप ते पत्रादेवी अशा दोन टप्प्यांचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. इंदापूर ते झाराप दरम्यानच्या तीन टप्प्यातील कामालादेखील वेग आला आहे. केंद्र सरकारने या कामांना मंजुरी दिल्यानेच हे शक्य झाले आहे. कोकणातील महामार्गालगतच्या सर्वच अडथळ्यांना दूर करण्याच्या दृष्टीने आवश्यक अशा प्रक्रियादेखील पूर्ण करण्यात आल्या असून, नुकसानभरपाई देण्यात आली आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वीजवाहिन्या आणि दूरध्वनीचे खांब हटविण्यास प्रारंभ झाला आहे. महामार्गावरील चौपदरीकरण दरम्यानचा घाटरस्ता असलेल्या ठिकाणी ३० मीटर तसेच शहरी भागात ४५ मीटर आणि शहराबाहेर सपाट भागात ६० मीटर रूंदीकरण करण्याची योजना आहे. रस्त्यालगत सर्व्हिस रोडही बांधला जाणार आहे़ याशिवाय बऱ्याच ठिकाणची वळणे काढून तीव्र उतार कमी करून रस्ता शक्यतो सरळ करण्यात येणार आहे़ याकामाने आता वेग घेतला आहे. विशेषत: भोस्ते, परशुराम, कामथे, निवळी या घाटातील वळणे काढण्यात येणार आहेत. खेड तालुक्यातील भरणेनाका आणि चिपळूण येथील बहाद्दूर शेख नाका, शिवाजीनगर येथे अंडरग्राऊंड पध्दतीने वाहनांची वाहतूक होणार असून, खेडमधील वेरळ आणि चिपळूण येथील वालोपे येथे उड्डाणपूल होणार आहेत. येथील जुन्या पुलाच्या जागी नवे पूल आकार घेणार आहेत. ६ मोठे पूल आणि तेही ६० मीटर लांब व २४ मीटर रूंद आकाराचे बांधण्यात येणार आहेत. १५ ठिकाणी लहान पूल बांधण्याचे नियोजन आहे. हे काम निश्चित कालावधीत पूर्ण करण्याचे संकेत असले तरी कालावधी वाढणार असल्याचे सूचित करण्यात आले आहे. ठेकेदाराच्या काम करण्याच्या पध्दतीवरही ते अवलंबून असेल. चिपळूण ते संगमेश्वर दरम्यान अंतर्गत वाहतूक करण्यासाठी ८ जागी पॅसेंजर अंडर पास मार्गाची निर्मिती करण्यात येणार आहे. चौपदरीकरणाच्या २८९ किलोमीटरसाठी २ हजार ८०० कोटी रूपये प्रस्तावित होते़ त्यास मंजुरी मिळाल्याने चौपदरीकरणातील अडथळे दूर झाले आहेत़ आता जगबुडी, वाशिष्ठी, शास्त्री आणि सोनवी या नद्यांवर पाच मोठे पूल बांधण्यात येणार आहेत. त्याकरिता ५५ कोटींचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग विभागाने मंजुरीला पाठवल्याचे सांगण्यात आले आहे. याखेरीज अन्य १५ लहान पुलांचा प्रस्तावही तयार करण्यात आला आहे. एकूण तीन टप्प्यात हे चौपदरीकरण होणार असून, ब्रिटिशकालीन पूल तसेच ठेवण्यात येणार आहेत. त्यांच्या बाजुलाच नवे तर कशेडी घाटात ४ किलोमीटर लांबीचा बोगदा तयार केला जाणार आहे. मुंबईहून कोकणात कमी वेळेत येणे शक्य होणार आहे. ४५ किलोमीटर अंतरावर एक टोल नाके बसवण्यात येणार आहे.
चौपदरीकरणातून आर्थिक समृध्दी येणे शक्य
By admin | Published: November 25, 2014 12:26 AM