मुंबई - माझा बालपणाचा काळ कोकणातील गावी गेला. तिथे जे पाहिले, अनुभवले त्यातून लेखनाची प्रेरणा मिळाली. मालवणी मुलुखातील लोकजीवन, संस्कृती यावर लिखाण करता आले. त्यामुळे आता मालवणी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली निवड ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे, अशी प्रतिक्रिया सहाव्या मालवणी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि प्रख्यात मालवणी लेखक प्रभाकर भोगले यांनी दिली. सहावे मालवणी साहित्य संमेलन येत्या रविवारी २३ जून रोजी मुंबईत होत आहे. त्यानिमित्ताने या संमेलनाचे अध्यक्ष प्रभाकर भोगले यांच्या घेतलेल्या विशेष मुलाखतीमध्ये भोगले यांनी आपला, जीवनप्रवास, मालवणी भाषेत साहित्यनिर्मितीची प्रेरणा, मालवणी भाषेची आजची स्थिती आणि मालवणीच्या प्रचारासाठी आगामी काळातील योजना अशा विविध मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केले.
मालवणी भाषेत साहित्यनिर्मिती करण्यासाठी कशी काय प्रेरणा मिळाली, अशी विचारणा केली असता भोगले यांनी सांगितले की, माझ्या जीवनातील सुरुवातीची काही वर्षे कणकवलीजवळील गावी गेली. सुरुवातीचे शिक्षणही तिथेच झाले. मालवणी मुलखातील लोकजीवन, संस्कृती, परंपरा पाहता आल्या. हे सारे शब्दबद्ध व्हावे, असे वाटायचे त्यातूनच मालवणीतून साहित्यनिर्मितीला सुरुवात झाली. सुदैवाने ही लेखन निर्मिती करताना मला फार अडचणींचा सामना करावा लागला नाही. आज बदलत्या काळासोबत विविध प्रादेशिक आणि बोलिभाषांप्रमाणेच मालवणीसमोरही आव्हान उभे आहे असे भोगले यांनी सांगितले. मात्र मालवणी भाषा नष्ट होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मालवणी भाषेतून साहित्यनिर्मिती झाली आहे. कलाकृती, नाटके निर्माण झाली आहेत. अजूनही ग्रामीण भागात मालवणी बोलली जाते, त्यामुळे मालवणी भाषा टिकून राहील, असे ते म्हणाले. सोशल मीडियाचा वापर वाढल्यापासून संवादाच्या या नव्या माध्यमावर मालवणीतून लिखाण मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्याबाबत प्रभाकर भोगले यांनी समाधान व्यक्त केले. मालवणीमधील लेखन वाचलं जातंय. लिहिलं जातंय, ही समाधानाची बाब आहे, असे त्यांनी सांगितले. मालवणी भाषेत लिखाण करणाऱ्या नवलेखकांना त्यांनी मोलाचा सल्लाही दिला.''केवळ सोशल मीडियावर लिहीत राहू नका. सोशल मीडियावर मिळणारा प्रतिसाद हा आभासी असतो. त्यापेक्षा हे लिखाण विविध नियतकालिकांमधून करण्याचा प्रयत्न करा. त्यातून तुमच्या लिखाणाला दिशा मिळेल. तसेच मालवणीतून लिखाण करताना संपूर्ण मालवणीचा वापर न करता थोडा मराठीचाही आधार घ्या, म्हणजे तुमचे लिखाण अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचेल," असे ते म्हणाले."काही कोसांवर बोली बदलते. मालवणी बोलीभाषेतही प्रत्येक भागानुसार बदल झालेला दिसून येतो. अशा बदलत्या शब्दांचा विभागवार संग्रह व्हावा, अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे मालवणी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून पुढील वर्षभरात मालवणी भाषेतील शब्दांचा तालुकावार संग्रह करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.