Join us

मुंबईत पाऊस पुन्हा बरसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 4:05 AM

मुंबई : शहरासह उपनगरात मुसळधार पावसाने गुरुवारीदेखील आपला मारा कायम ठेवला. गुरुवारी मुंबईत सरासरी ७० मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला ...

मुंबई : शहरासह उपनगरात मुसळधार पावसाने गुरुवारीदेखील आपला मारा कायम ठेवला. गुरुवारी मुंबईत सरासरी ७० मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला असतानाच अंधेरी पूर्वे येथील मरोळमधल्या सैफी मंझिल को-ऑप. सोसायटी येथे डोंगरावरील काही दगड खाली आले. याची माहिती मिळताच आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या कार्यपद्धतीनुसार घटनास्थळी मदतकार्य रवाना करण्यात आले. सुदैवाने यात वित्त आणि जीवितहानी झाली नाही.

मुंबईत दिवसभर विश्रांती घेत पावसाचा मारा सुरू होता. गुरुवारी सकाळपासून मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने पुन्हा एकदा जोर पकडला. उपनगरांत वाऱ्यासह पावसाच्या मोठ्या सरी कोसळत होत्या. दिवसभर मुंबईत ताशी ४६ ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. याच काळात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या. सहा ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळला. दहा ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. तीस ठिकाणांहून झाडे कोसळल्याच्या तक्रारी महापालिकेस प्राप्त झाल्या.

बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास अंधेरी पूर्वेकडील तक्षशिला पोलीस चौकी येथे झाड पडून एक तरुण जखमी झाला. कुपर रुग्णालयात त्यास उपचारार्थ दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती स्थिर आहे. गुरुवारी सकाळी कोसळलेल्या पावसाने दुपारी काही काळ विश्रांती घेतली होती. मात्र याच काळात तुरळक ठिकाणी वाऱ्याच्या वेगाने पावसाच्या मोठ्या सरी कोसळत होत्या.

-----------------------

पाऊस मिमी

मुंबई शहर ७४

पश्चिम उपनगर ६०

पूर्व उपनगर ७१

-----------------

पाऊस मिमी

महालक्ष्मी १४४

मानपाडा १३०

मुंब्रा १४५

कासार वडवली १२७

राममंदिर ९८

विक्रोळी ८७

----------------