लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अरबी समुद्रात उठलेल्या तौक्ते चक्रीवादळासह कोसळलेल्या पावसाने मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांना सोमवारी अक्षरश: झोडपून काढले. वादळाच्या या जोरदार तडाख्यामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये या परिसरात एकूण नऊ नागरिक मृत्युमुखी पडले. जोरदार वाऱ्यामुळे ठिकठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडून अनेक अपघात झाले. दिवसभर या परिसरातील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले होते.
सोमवारी सकाळपासूनच मुंबईच्या समुद्रात चक्रीवादळाचे तांडव सुरू झाले. दुपारी १२च्या सुमारास चक्रीवादळ मुंबईच्या १४५ किमी अंतरावर दाखल झाले आणि मुंबईत वाऱ्यांसह पावसाचा वेग वाढला. समुद्राला भरती आली. दादर येथील हिंदमातासह सखल भागात पाणी साचले. येथील पाण्याचा निचरा करण्यासाठी मुंबई महापालिकेचे कर्मचारी प्रयत्नशील हाेते. सायंकाळी ४ वाजेपर्यंत मुंबईत पावसाने तुफान फटकेबाजी केली. याचवेळी वारेही वाहत असल्याने आधीच काेराेनाचा ताप असलेल्या मुंबईकरांवर जणू नवे संकट घाेंघावू लागले.
महापौर किशोरी पेडणेकर याच काळात रस्त्यावर उतरल्या. त्यांनी गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव, वरळी सी-फेस, दादर या चौपाट्यांची पाहणी करून महापालिकेने समुद्र किनाऱ्यांवर केलेल्या तयारीचा आढावा घेतला. मुंबईकर नागरिकांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये, असे आवाहनही केले.
ठाणे जिल्ह्यात सोमवारी दिवसभर वादळी वाऱ्यासह पावसाची संततधार कोसळली. यामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये ठाणे व उल्हासनगर, मीरारोड या शहरांत प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. कल्याण - शीळ रस्त्यावर जाहिरात फलक कोसळून टेम्पोतील दोघे जखमी झाले, तर मुंब्रामध्ये ब्लॉक घरावर पडल्याने तीन मुलांसह आईवडील जखमी झालेत तर ठाण्यात झाड कारवर पडून डॉ. रितेश गायकवाड हे जखमी झाले आहेत.
सोमवारी पावसासह वादळी वारा ताशी ९० ते १०० किमी. वेगाने वाहिल्याने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले. गेल्या २४ तासांच्या कालावधीत सरासरी ११.५ मिलिमीटर पाऊस पडला. काही शहरांमध्ये दिवसभर विजेच्या लपंडावास नागरिकांना तोंड द्यावे लागले. जिल्ह्यात ठिकठिकाणी १३३ झाडे उन्मळून पडली, तर १२५ झाडांच्या फांद्या व झाडे बहुतांश वाहनांवर पडल्याने नुकसान झाले.
तौक्ते वादळाने रायगडच्या समुद्रकिनारी असणाऱ्या गावांमध्ये चांगलेच थैमान घालत चार जणांचे जीव घेतले. नीता नाईक (५०, केगाव, उरण), सुनंदाबाई घरत (५५, उरण- नागाव), रामा बाळू कातकरी (८०, गागोदे-पेण) आणि रमेश नारायण साबळे (४५, धाटवा, मूळ रा. बुलडाणा) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. बाराशेहून अधिक घरांची पडझड झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दोन हजार कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याने मोठी हानी टळल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. वादळाने जनजीवन विस्कळीत झाले. अलिबाग समुद्रकिनारी असणारी शेड उडून गेली. पाचनंतर वादळ गुजरातकडे सरकले मात्र तोपर्यंत जिल्ह्यात फार मोठे नुकसान झाले होते, रात्री उशिरापर्यंत वादळाचे थैमान सुरूच होते.
पालघरच्या किनारपट्टीवर धडक न देता समुद्रातूनच आपली मार्गक्रमणा सुरू ठेवत चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने गेल्याने पालघर जिल्हावासीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र जिल्ह्यात प्रचंड वादळी वाऱ्याबरोबरच कधी रिमझिम तर कधी मुसळधार पाऊस सोमवार सकाळपासून कोसळत होता. यामुळे जिल्ह्यातील आठही तालुक्यातील अनेक घरांचे नुकसान झाले असून, काही घरांवर झाडे पडणे तसेच घरांचे पत्रे उडून जाण्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्यामुळे वीजपुरवठाही खंडित झाला होता.
..............................................................
* सी लिंक बंद
दक्षिण मुंबईला जोडणारा सी लिंक चक्रीवादळामुळे सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आल्याची माहिती पालिकेने सोमवारी सकाळी साडेदहा वाजता दिली. मुसळधार पावसाच्या सरी आणि वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे सी लिंक प्रवासाकरिता बंद केल्याचे वाहतूक विभागाने स्पष्ट केले.
* मोनोची सेवा खंडित
प्रचंड पाऊस आणि वेगाने वाहणारे वारे यामुळे सोमवारी सकाळी १० वाजता चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक या मार्गावर धावणारी मोनो रेलची सेवा खंडित करण्यात आल्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने सांगण्यात आले.
...............................................
ताशी ११४ कि.मी. वेगाने वाहिले वारे; झाडे उन्मळली
सोमवारी दुपारी २ वाजेपर्यंत मुंबईत वाऱ्याचा सर्वाधिक वेग हा कुलाबा येथील अफगाण चर्च येथे नोंदविण्यात आला. येथे सव्वाबाराच्या सुमारास ताशी १११ कि.मी. वेगाने वारे वाहिले, तर दुपारी २ वाजता हाच वेग ताशी ११४ कि.मी. एवढा नोंदविण्यात आला.
...............................................................................................................