Join us

मोठा पाऊस पडला आणि मुंबईकरांना २६ जुलैची आठवण झाली!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 7:13 PM

६ जुलै म्हणजे आजच्या दिवशी पावसाचा वेग कायम राहिल्याने मुंबईकरांना २६ जुलैच्या महाप्रलयाची आठवण झाल्याने त्यांच्या अंगावर काटा उभा राहिला होता.

मुंबई : वाऱ्याच्या वेगाने मोठ्या सरींना घेऊन आलेल्या पावसाने बुधवारी पुन्हा एकदा मुंबईचा चक्काजाम करून टाकला. मुंबई शहराच्या तुलनेत मुंबईच्या उपनगरात विशेषतः पश्चिम उपनगरात पावसाने मुंबईकरांना जेरीस आणले. विशेषतः सकाळी ११ वाजल्यापासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत ठीक ठिकाणी अधून मधून पडलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. या कारणास्तव मुंबईचा वेग कमी होण्यासह इच्छित ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांची दैना उडाली होती; आणि २६ जुलै म्हणजे आजच्या दिवशी पावसाचा वेग कायम राहिल्याने मुंबईकरांना २६ जुलैच्या महाप्रलयाची आठवण झाल्याने त्यांच्या अंगावर काटा उभा राहिला होता.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने बुधवारी मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी केला होता. त्यानुसार सकाळी अकरा वाजेपर्यंत पावसाची अगदीच सामान्य हजेरी लागत होती. सकाळी ११ नंतर मात्र मुलुंड, भांडुप, कांजुरमार्ग, विद्याविहार, घाटकोपर, कुर्ला, साकीनाका, पवई आणि सायन या परिसरात पावसाने तुफान फटकेबाजी सुरू केली. दुपारी बारा वाजता दरम्यान कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे लालबहादूर शास्त्री मार्गावरील शीतल सिनेमा आणि कल्पना सिनेमा या दोन सिग्नलच्या ठिकाणी गुडघ्या एवढे पाणी साचले होते. या साचलेल्या पाण्यातून वाहने आपली वाट काढत असली तरी देखील छोटी वाहने बंद पडली होती. सगळ्याच वाहनांना साचलेल्या पाण्यातून वाट काढता येत नसल्याने लाल बहादूर शास्त्री मार्गावर कुर्ला डेपोपासून कमानी सिग्नलपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

पश्चिम उपनगरात दहिसर, साकीनाका, पवई, अंधेरी या परिसरात देखील मोठ्या पावसाची सातत्याने हजेरी लागत होती. साकीनाका परिसरात पावसामुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती तर सातत्याने पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने वाहनांचा वेग देखील कमी झाला होता. मुंबई शहराचा विचार करता माटुंगा, दादर, प्रभादेवी, वरळी, महालक्ष्मी, नरिमन पॉईंट, गिरगाव या परिसरात दुपारी दोन वाजता मोठ्या पावसाने हजेरी लावली. दादरमध्ये दुपारी २ वाजता पडलेल्या मुसळधार पावसामुळे वाहतुकीचा वेग किंचित कमी झाला होता. दादर हे मुंबईचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने मुंबईकरांची येथे मोठी गर्दी होते. याच गर्दीला पावसाने धू धू धुतले.

मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे या तिन्ही मार्गावरील लोकल वाहतूक धावत असली तरी देखील रोजच्या वेळेप्रमाणे लोकलचा फलाटांवर येण्याचा काळ किंचित का होईना मागे पुढे झाला होता. शिवाय पावसाच्या मोठ्या सरी कोसळत असल्याने कुर्ला, घाटकोपर, दादर, भायखळा अशा मोठ्या रेल्वे स्थानकांच्या परिसरात रेल्वे प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. पावसाचा वेग आणि तिरप्या कोसळणाऱ्या सरीमुळे पावसाचे पाणी लोकलमध्ये देखील दाखल होत होते. यामुळे लोकांमध्ये बसलेल्या नागरिकांना देखील पावसाच्या तुषार सिंचनाचा अनुभव येत होता.

शाळेतल्या मुलांची कसरतऐन दुपारी शाळा सुटण्याच्या आणि शाळा भरण्याच्या वेळेला, शिवाय संध्याकाळी शाळा सुटण्याच्या वेळेला पावसाने मुंबईत सर्वत्र तुफान हजेरी लावली. याच धुमशान पावसामध्ये पालकांची आणि विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली होती.

बाजार भिजलेमुंबईतल्या बहुतांशी बाजारपेठ या संध्याकाळी हाउसफुल होतात. मात्र संध्याकाळचा पाऊस तुफान असल्याने बाजारपेठ देखील उशिरा सुरू झाल्या. बाजारपेठांमध्ये गर्दी कमी असली तरी दाखल होणाऱ्या नागरिकांना पावसामुळे अनंत अडचणींना सामोरे जावे लागले.

आज २६ जुलै आहे...मुंबईत संपूर्ण दिवस मुसळधार पाऊस कोसळत असल्याने मुंबईकरांच्या रंगलेल्या गप्पांमध्ये सातत्याने २६ जुलैच्या महापुराचा उल्लेख केला जात होता. आज २६ जुलै असल्याने पाऊस तेव्हा सारखा कोसळत आहे आणि मुंबई पाण्याखाली जाण्याची भीती आहे, अशा काहीशा गप्पा रंगताना मुंबईकरांच्या अंगावर काटा उभा राहत होता.

कुठे पडला किती पाऊस / सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत पाऊस / मिमीशहर ७६पूर्व उपनगर ५८पश्चिम उपनगर ७०

मंगळवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून बुधवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत पडलेला पाऊससांताक्रुझ ८६कुलाबा ४४वांद्रे ५८दहिसर ११२राम मंदिर ८७चेंबुर ३२फोर्ट ४३सायन ५१कुर्ला १०८____वेधशाळाकुलाबा १०३सांताक्रुझ ७८

- यंदाच्या मोसमात जुलै महिन्यात पडत असलेल्या पावसाने मागील पावसाचा रेकॉर्ड मोडला आहे. २०२० साली जुलै महिन्यात पावसाची नोंद १ हजार ५०२.६ मिमी होती. यंदाच्या पावसाची नोंद १ हजार ५१२.६ मिमी एवढी नोंदविण्यात आली आहे.

- सांताक्रुझ येथील विविध शाळेमध्ये देखील पावसाची नोंद २ हजार १५ मिलिमीटर एवढी करण्यात आली.

या जिल्ह्यांना रेड अलर्टभारतीय हवामानशास्त्र विभागाने गुरुवारी पुणे, रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. तर विदर्भातील गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांना देखील रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या चार जिल्ह्यांसोबत सिंधुदुर्ग, कोल्हापूर, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

- बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली विकसित झाली आहे. वायव्य दिशेला तिची हालचाल होण्याची शक्यता असल्याने पुढील ५ दिवसांत महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.- कृष्णानंद होसाळीकर, अतिरिक्त महासंचालक, भारतीय हवामान शास्त्र विभाग 

टॅग्स :पाऊसमुंबई