Join us

जिंकणारच यात वाद नाही म्हणत घेताहेत कोरोनावर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2021 4:07 AM

रुग्णालयातूनही सुरू आहे सकारात्मक विचार पोहचविण्याची धडपडमनीषा म्हात्रेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘दुनियेचे निस्तारता निस्तारता कोरोनाने दुसऱ्यांदा ...

रुग्णालयातूनही सुरू आहे सकारात्मक विचार पोहचविण्याची धडपड

मनीषा म्हात्रे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ‘दुनियेचे निस्तारता निस्तारता कोरोनाने दुसऱ्यांदा गळाभेट घेतलीच. पहिल्यावेळी सगळे लवकर निभावून गेले; पण आता जरा जड जातेय. एकट्यावर निभावले की माणूस थोडा बेडर असतो; पण संपूर्ण घरादारावर ओढावले की घाबरून जायला होते. तरीही हाती असलेल्या एकमेव सकारात्मकतेच्या शस्त्राच्या बळावर सर्वांचा सामना करायला मैदानात उतरलोय. अटीतटीची लढाई सुरू आहे. पण.. जिंकणार यात कुठलाही वाद नाही’, असे म्हणत राज्य गुप्तवार्ता विभागातील सहायक गुप्तचर अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या राणी पवार - फाकटकर कोरोनाशी लढा देत आहेत. रुग्णालयात उपचार घेत असतानाही वाचन, लेखनाची आवड जोपासत, त्या सकारात्मक विचार समाजमाध्यमांतून नागरिकांपर्यंत पोहचविण्याची कामगिरी पार पाडताना दिसत आहेत.

नवी मुंबईत पती आणि दोन मुलांसोबत राहत असलेल्या राणी या २००४ मध्ये पोलीस दलात दाखल झाल्या. मुंबई गुन्हे शाखेचा सायबर विभाग, मंत्रालय आणि विशेष शाखा एक येथे त्यांनी उत्तम सेवा बजावली आहे. गेल्या ७ वर्षांपासून त्या राज्य गुप्तवार्ता विभागात सहायक गुप्तचर अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. आपले कर्तव्य बजावताना दुसऱ्यांदा त्यांना कोरोनाची बाधा झाली. गेल्या दहा दिवसांपासून सेवन हिल्स रुग्णालयात त्या कोरोनावर उपचार घेत आहेत.

राणी यांना लहानपणापासून वाचनाची प्रचंड आवड आहे. त्यांची घरातच लायब्ररी आहे. शक्यतो बहुतांश महिला दर महिन्याला कपडे आणि सौंदर्यप्रसाधनांच्या मागे धावताना दिसतात. मात्र राणी यांचा नवनवीन पुस्तकांच्या खरेदीकडे कल असतो. त्या सांगतात, आपल्याकडे खूप गोष्टी आहेत, ज्या शेअर होणे गरजेचे आहे. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांना त्यांनी शब्दबद्ध करण्याचे ठरवले आणि गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी लिखाणही सुरू केले. समाजमाध्यमांद्वारे त्याचा प्रसार सुरू केला. कोरोनाच्या काळात आपल्या सकारात्मक लिखाणातून इतरांना क्षणिक आनंद तरी मिळावा म्हणून त्यांची धडपड सुरू आहे.

कर्तव्याच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आणि घरी परतताना त्या लोकलने प्रवास करतात. या मिळालेल्या वेळेत त्यांचे लिखाण किंवा वाचन सुरू असते. राणी यांनी स्वतःचा ब्लॉग तयार केला असून, त्यावर त्या लेख पोस्ट करतात तसेच सोशल मीडियावरूनही हे लेख शेअर करत नागरिकांना सकारात्मकतेचे महत्त्व पटवून देत आहेत.

त्यांनी सांगितले की, ‘मी मोठी लेखिका वगेैरे नाही. मात्र आपल्या लिखाणातून कुणाला क्षणिक आनंद मिळत असेल तरी त्याचे समाधान वाटते. मला जवळच्या मित्रमैत्रिणी, नातेवाइकांडून चांगला प्रतिसाद मिळतो. त्यामुळे आत्मविश्वास वाढतो’.

* आयुष्यात कमाविण्याच्या नादात जगणे विसरू नका!

रुग्णालयातही त्यांचे वाचन आणि लेखन सुरू आहे. ही आवड मला लढण्यास बळ देते, असे त्या सांगतात. उपचारांदरम्यान, त्यांची दुसरी काेराेना चाचणीही पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना आणखी काही दिवस रुग्णालयातच रहावे लागणार आहे. पण यामुळे खचून न जाता त्या सांगतात, पुढच्या क्षणाचा विचारात आजचा दिवस घालवू नका. आजचा दिवस जगा. आयुष्यात कमाविण्याच्या नादात जगणे विसरू नका, इथे आपल्याला पुढच्या क्षणी क़ाय होणार हे माहिती नाही, त्यामुळे आहे तो वेळ, तो सत्कर्म करत मार्गी लावणे गरजेचे आहे. त्या सांगतात, ‘प्रत्येक क्षणाला परिस्थिती बदलत आहे. मलाही एका क्षणाला वाटले की आता सगळे थांबले, मात्र नंतर विचार केला की, कदाचित पुढे काहीतरी चांगले होणार असेल. त्यामुळे पूर्ण वेळ स्वतःची आवड जोपासून नागरिकांमध्ये सकारात्मकता पसरविण्याचा प्रयत्न सुरू आहे’.

----------------------