महापाैर किशाेरी पेडणेकर : दाेषींवर कारवाई, भूमाफिया टोळीचा बंदोबस्त करणार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वर्सोवा यारी रोड येथील सिलिंडर गोदामाला लागलेल्या आगीची दखल महापाैर किशाेरी पेडणेकर यांनी घेतली. एका व्यक्तीच्या फायद्यांसाठी अनेकांचा जीव धोक्यात घालणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेची सर्वंकष चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अग्निशमन दलाच्या १६ गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. अग्निशमन दलाने आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर केले. या घटनेबाबत सर्व यंत्रणांची आगामी दोन दिवसांत बैठक घेऊन पुढील कार्यपद्धती निश्चित केली जाणार आहे.
दरम्यान, मानखुर्द - घाटकोपर लिंक रोडवरील, मानखुर्द मंडाळा येथील कुर्ला भंगार गोदामाला आग लागल्याची दुर्घटना नुकतीच घडली हाेती. ही जागा जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत येत असून या ठिकाणी अवैधपणे ऑइलचा साठा करण्यात येत असल्याची माहिती महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाला वेळोवेळी दिली होती.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने यापूर्वी महापालिका व पोलिसांच्या मदतीने कारवाईही झाली. परंतु कारवाईनंतर पुन्हा भूमाफिया तिथे सक्रिय होऊन अवैध अड्डे स्थापन करीत असतात. त्यातूनच आगीची दुर्घटना घडली. याचे गांभीर्य लक्षात घेऊन भूमाफिया टोळीचा बंदोबस्त करण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले.
.................................