केंद्र आणि राज्य शासनाच्यामध्ये दुवा म्हणून कार्य केले पाहिजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:06 AM2021-07-26T04:06:39+5:302021-07-26T04:06:39+5:30
मुंबई : औद्योगिक संघटनांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या मध्ये एक दुवा म्हणून कार्य केले पाहिजे. विविध योजना लघु व ...
मुंबई : औद्योगिक संघटनांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या मध्ये एक दुवा म्हणून कार्य केले पाहिजे. विविध योजना लघु व मध्यम उद्योजकांपर्यंत पोहचवाव्यात, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले. महाराष्ट्र इंडस्ट्रीयल आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असोसिएशन आणि एसएमई चेंबर ऑफ इंडिया यांच्या समृद्धी व्हेंचर पार्क, एमआयडीसी अंधेरी येथील नूतन कार्यालयाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.
सुभाष देसाई म्हणाले, औद्योगिक संघटनांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या मध्ये एक दुवा म्हणून कार्य केले पाहिजे, त्यांच्या विविध योजना लघु व मध्यम उद्योजकांपर्यत पोहचविल्या पाहिजेत. त्यांच्यामधून बरेचसे प्रश्न सुटू शकतात, असे ते म्हणाले. महाराष्ट्र इंडस्ट्रियल आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असोसिएशन आणि एसएमई चेंबर ऑफ इंडिया या संस्था अधिक जोमाने वाटचाल करतील आणि ज्या लघु व मध्यम उद्योजकांसाठी या संस्था कार्यरत आहेत त्यांना मदत करण्यासाठी त्यांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी तत्पर राहतील अशी अपेक्षा आहे.
या संस्थांच्या मार्फत उद्योजकांना लाभ नक्कीच होईल अशी आशादेखील त्यांनी व्यक्त केली. तसेच मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बँकांचे आणि रिझर्व्ह बँकेचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक बोलावून उद्योजकांना बँकिंग क्षेत्रातील समस्यांवर चर्चा करण्यात येईल, असेही ते म्हणाले. एसएमई चेंबर ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत साळुखे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. यावेळी उद्योजकांना येत असलेल्या समस्यांची माहिती त्यांनी दिली त्याचप्रमाणे शासनाकडून वेळोवेळी मिळत असलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी सुभाष देसाई यांचे आभार मानले. यावेळी उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
लघु व मध्यम उद्योजकांसाठी 'प्लग एंड प्ले' योजना
कोरोनाच्या काळात ई-कॉमर्समुळे फूड प्रोसेसिंग क्षेत्रात प्रचंड मोठा वाव आणि संधी निर्माण झाल्या आहेत. राज्य शासनाने ठिकठिकाणी फूडपार्क सुरू केले आहेत, लघु व मध्यम उद्योजकांना जागा विकत घेऊन त्यावर बांधकाम करून उद्योग सुरू करण्यात अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे सर्व सोयांनी युक्त असे प्रिमायसेस एमआयडीसी उपलब्ध करून देणार आहे (प्लग एंड प्ले ही योजना) जेणेकरून त्यांना त्वरित उत्पादन सुरू करता येईल. यासाठी एसएमई चेंबरच्या बरोबर सामंजस्य करार करण्यातदेखील येईल असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी जाहीर केले.