शिक्षक संघटनांची मागणी; नियमकांनाही बोर्डामध्ये बोलावू नये
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : यंदा दहावीची परीक्षा उशिरा म्हणजेच मे महिन्यात असल्याने उत्तरपत्रिका तपासणी आणि मूल्यमापन प्रक्रियेत शिक्षकांचे पुढील २ महिने म्हणजे शाळा सुरू होईपर्यंतचा वेळा जाणार आहे. या मूल्यमापन प्रक्रियेत गतिमानता आणण्यासाठी शाळास्तरावर उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन करून त्या नियमकाकडे शाळेतूनच पाठवाव्यात. तसेच नियमकाने जवळच्या कस्टडीट पाठवून गुणपत्रिका त्या ठिकाणीच दिल्या तर उत्तरपत्रिका तपासणी लवकर होऊ शकेल. या प्राक्रियेत शिक्षकांना कोरोना संसर्गाचा धोकाही कमी असेल, असे मत शिक्षक संघटनांनी मांडले. शिक्षण विभागाने यावर विचार करून निर्णय घ्यावा तसेच मुख्यमंत्र्यांनी यात स्वतः लक्ष द्यावे यासाठी राज्य शिक्षक परिषदेकडून पत्र लिहिण्यात आल्याची माहिती कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा परीक्षा उशिरा होणार असल्याने साहजिकच निकालावरही त्याचा परिणाम होईल. सध्या कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. पुढील काही काळात संसर्गाचे प्रमाण कसे व काय असेल, याचा अंदाज नसल्याने पर्यवेक्षक, नियामक यांना देण्यात येणाऱ्या सूचनांसाठी त्या त्या विषयच्या परीक्षेच्या दिवशीच नियमकांची ऑनलाइन सभा लावून त्यांना उत्तरपत्रिका तपासणीविषयक सूचना द्याव्यात अशी शिक्षकांची मागणी आहे. त्यासाठी त्यांना बोर्डात बोलावू नये. तसेच नमुना उत्तरपत्रिकाही ऑनलाइन मिळावी, अशी तरतूद करावी अशी मागणी शिक्षक करत असल्याची माहिती दराडे यांनी दिली.
....................