मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे नाव कोणाच्या तरी स्वार्थासाठी वापरले जात आहे. आज महापौर बंगला मागतायत, उद्या राजभवन मागतील. शिवसेना सत्तेत असताना बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी जागा मिळू नये ही लाजिरवाणी बाब आहे, असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला आहे. त्याचबरोबर शिवाजी पार्कवरील जिमखान्याच्या जागेवर महापौर बंगला बांधू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. या प्रकरणी त्यांनी आयुक्त अजय मेहता यांची पालिका मुख्यालयात गुरुवारी भेट घेतली.दादर येथील महापौरांच्या निवासस्थानाची जागा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यमान महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या राहण्याची तात्पुरती व्यवस्था भायखळा येथील राणीच्या बागेतील पालिका बंगल्यात करण्यात आली आहे. याच दरम्यान महापौर निवासस्थानासाठी शिवाजी पार्क येथील पालिका जिमखान्याच्या जागेचे आरक्षण बदललले आहे. मात्र शिवाजी पार्कवरील जिमखान्याच्या जागेवर महापौर निवासस्थान होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका राज ठाकरे यांनी गुरुवारी मांडली. तेथे खेळाचे मैदान आहे, ते खेळाचे मैदानच राहू दे, असे त्यांनी आयुक्तांना सांगितले. महापौरांना हक्काचा बंगला मिळत नाही ही महापौरपदाची थट्टा आहे. पालिकेकडे अनेक भूखंड आहेत. त्यातील महापौर बंगल्यासाठी देता येईल. मात्र शिवाजी पार्क येथील जिमखान्याच्या जागेवर महापौर बंगला होऊ नये. लोक ज्या भूखंडावर खेळत आहेत ती जागा महापौरांसाठी देणे अयोग्य असल्याचे मत राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.शिवसेनेने महापौरपद आणि महापौरांची चेष्टा केली आहे, अशी खोचक प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली. दरम्यान, फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरही त्यांनी आयुक्तांशी चर्चा केली. मनसेने आंदोलन केल्यानंतर त्या वेळी रेल्वेच्या दीडशे मीटर जागेत फेरीवाले बसणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले होते. आता पालिका अधिकारी पैसे घेऊन फेरीवाल्यांना बसवत आहेत. त्यांना तत्काळ हटवावे, अन्यथा पुन्हा आंदोलन करू, असा इशारा ठाकरे यांनी आयुक्तांना दिला.
‘बाळासाहेबांच्या स्मारकासाठी जागा मिळू नये, ही लाजिरवाणी बाब’
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 3:20 AM