शाळेतच शिकविले पाहिजे ‘मासिक पाळी व्यवस्थापन’
By admin | Published: May 28, 2017 02:38 AM2017-05-28T02:38:34+5:302017-05-28T02:38:34+5:30
एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या समाजात आजही मासिक पाळीविषयीचे अज्ञान आणि गैरसमज आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील ६० टक्क्यांहून अधिक मुली
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या समाजात आजही मासिक पाळीविषयीचे अज्ञान आणि गैरसमज आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील ६० टक्क्यांहून अधिक मुली ‘त्या’ दिवसांमध्ये शाळेत जात नाहीत. त्यामुळे आजच्या समाजात मुलींना शालेय अभ्यासक्रमात ‘मासिक पाळी व्यवस्थापना’चे धडे दिले पाहिजेत, असे मत सामाजिक-आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
महिला बालविकास विभाग आणि युनिसेफ यांच्या वतीने आयोजित जागतिक आरोग्य संघटनेकडून २८ मे हा दिवस ‘जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन’ म्हणून साजरा करण्याचे विभागाच्या वतीने ठरविण्यात आले आहे. त्या निमित्ताने आजही मासिक पाळीविषयी समाजात रुजलेल्या समज-गैरसमजांकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले.
मासिक पाळीदरम्यानच्या व्यवस्थापनाविषयी कामा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. राजश्री कटके यांनी सांगितले की, प्रत्येक मुलीला प्रथमत: आईकडून मासिक पाळीविषयी माहिती मिळाली पाहिजे. आईने या विषयासंदर्भात गुप्तता न पाळता, मुलीला व्यवस्थित समजावले पाहिजे. आईनंतर ‘मासिक पाळी व्यवस्थापना’चे धडे शाळांमधून दिले पाहिजे. याची अधिक गरज ग्रामीण भागांत आहे, परंतु ग्रामीण भागांत याविषयी कमालीची उदासीनता असून, आजही सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर कित्येक जण करीत नाही. त्यामुळे मासिक पाळी व्यवस्थापनाविषयी शालेय अभ्यासक्रमातून शिकविले पाहिजे. तर ‘पॉप्युलेशन फर्स्ट’ सामाजिक संस्थेच्या अनुप्रिया साठे यांनी सांगितले की, मासिक पाळी व्यवस्थापन शिकविण्यासाठी शाळा हे उत्तम व्यासपीठ आहे. बऱ्याचदा घरातही मासिक पाळीविषयी खुलेपणाने बोलले जात नाही. त्यामुळे इतरत्र वावरतानाही मुलींना अंधश्रद्धा- गैरसमजांसहित मासिक पाळीचे ओझे वाहावे लागते. समाजातील हे चित्र बदलण्यासाठी तळागाळातील मुलीपर्यंत सॅनिटरी नॅपकिन्स पोहोचले पाहिजेत. शाळांमध्ये याविषयी विशेष सत्र आयोजित केली पाहिजेत. त्यात आरोग्य, सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी याविषयी मार्गदर्शन केले पाहिजे. गेल्या काही वर्षांत मासिक पाळी येण्याचे वय कमी झाले आहे. मात्र, यामध्ये काही घाबरण्याचे कारण नाही, असे मत स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. बंदिता सिन्हा यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
१० हजार मुली, महिलांनी गिरवले मासिक पाळी स्वच्छतेचे धडे
वाशिम जिल्ह्यातील शेलू बाजार गावच्या मुलीने गेल्या साडेतीन वर्षांत १० हजार मुली-महिलांना मासिक पाळीबाबत जनजागृती केली आहे.
शेलू बाजार गावात राहणारी शीतल चौधरी ही सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे. शीतल १२ वीच्या अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी अनाथ आश्रमात जाऊन तिथल्या मुलांशी संवाद साधायची. त्यामुळे या आश्रमातील मुलींशी तिची चांगलीच गट्टी जमली. या वेळी मुली तिला वयात आल्यावर होणाऱ्या शारीरिक, मानसिक बदलांविषयी विचारायच्या. या वेळी या मुलींना मासिक पाळीविषयी माहिती देण्यासाठी कोणीच नसते, हे तिच्या लक्षात आले. यातूनच ‘ब्लीड द सायलेन्स’चा जन्म झाला.
शीतल सांगते, आधी मला हा प्रश्न फक्त अनाथआश्रमातील मुलींचा आहे असे वाटत होते, पण हळूहळू अन्य मुलींशी संवाद साधायला सुरुवात केल्यावर कुटुंबातही याविषयी चर्चा होत नसल्याचे लक्षात आले. मुलीला फक्त वयात आल्याचे सांगितले जाते. मासिक पाळीवेळी मुलींच्या शरीरात विशिष्ट बदल होतात. या वेळी स्वच्छता पाळणे आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन स्वत:च्या अनुभव कथनातून मुली-महिलांशी संवाद साधते.