मुंबई : मुंबईतील रस्ते बांधकामासाठी पालिका प्रशासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र, अनेक ठिकाणी अल्पावधीतच रस्त्यांची चाळण होऊन रस्ते खड्डेमय होतात. पावसाळा तोंडावर आला, तरी अजूनही ५० टक्के खड्डे बुजविणे बाकी आहे आहेत, असा दावा महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.
मुंबईमध्ये होणाऱ्या अपघातांना कारणीभूत असलेल्या महत्त्वाच्या कारणांमध्ये खड्डे हे एक कारण आहे. गेल्या वर्षी घाटकोपरमधील खराब रस्त्यामुळे वाहन पलटी होऊन वडिलांसह एका सात वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. एकीकडे रस्ते कामांचे प्रस्ताव आचारसंहितेत रखडू नये, यासाठी फेब्रुवारीमध्येच रस्त्यांचे कोट्यवधी रुपयांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. मंजूर केल्यानंतर पुढील सात दिवसांत कामांची वर्क आॅर्डर काढणे आवश्यक होते. मात्र, तीन महिने उलटले, तरी अद्याप ही वर्क ऑर्डर काढण्यात आलेली नाही.
मुंबईतील रस्त्यावर पडणारे खड्डे बुजविण्यासाठी पालिकेने मागील २०१७ पासून कोल्डमिक्स वापरण्यास सुरुवात केली. यंदाच्या पावसातही १,२०० मेट्रिक टन कोल्डमिक्सचे उद्दिष्ट्य असून, त्याचे उत्पादन वरळी येथील डांबर प्लांटमध्ये करण्यात आले असून, आतापर्यंत १,१५० मेट्रिक टन कोल्डमिक्स तयारही झाले आहे. त्यातील ९३० मेट्रिक टन कोल्डमिक्सचे वाटपही सर्व वॉर्डात करण्यात आले आहे.
गेल्या वर्षी दुसऱ्या दिवशीच उकरले होते खड्डे
धो-धो पावसात कोल्डमिक्सचा वापर खड्डे भरण्यासाठी केला जाईल व एकदा भरलेला खड्डा पुन्हा उकरणार नाही, असा दावा पालिकेने केला होता. मात्र, गेल्या वर्षीच्या पावसात अनेक ठिकाणी कोल्डमिक्सचा परिणाम फारसा जाणवला नव्हता. काही ठिकाणी भरलेले खड्डे दुसºया दिवशीच उकरले गेल्याचे समोर आले होते.
खड्डे जैसे थेमहापालिकेने आता काही ठिकाणी खड्डे भरले आहेत, पण ५० टक्के बुजविणे बाकी आहे. अनेक रस्त्यांवरील खड्डे जैसे थे आहेत. काही दिवसांत पावसाळा सुरू होईल खड्ड्यांमध्ये आणखी वाढ होईल. - रवी राजा, विरोधी पक्षनेता
अंतर्गत रस्ते, रहिवासी भागामधील खड्डे बुजवायला हवेतकंत्राटदार ते खड्डे बुजविण्याकडे लक्ष देत नाहीत. आजही काही प्रमुख रस्ते, तसेच अंतर्गत रस्ते, रहिवासी भागात खड्डे आहेत. फक्त मोठे रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याकडे लक्ष दिले जाते. यासोबतच अंतर्गत रस्ते, रहिवासी भागात खड्डे आहेत ते बुजवायला हवेत. - राखी जाधव, गटनेता, राष्ट्रवादी काँग्रेस