अग्निशमन दलाच्या अहवालाची प्रतीक्षा : वर्सोवा पोलिसांकडून तपास सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अंधेरी पश्चिम येथील यारी रोडच्या निवासी भागातील एचपी सिलिंडरचा स्फोट हा गुदामात गॅस लिक झाल्याने घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी अग्निशमन दलाच्या अहवालाची प्रतीक्षा असल्याचे वर्सोवा पोलिसांनी सांगितले.
गुदाममालक होटी वाडीलाल याला बुधवारी म्हणजे सिलिंडरचा स्फोट झाला त्याच रात्री अटक करण्यात आली. सोमवारपर्यंत पोलीस कोठडी मिळालेल्या होटी याची चौकशी सुरू असून, त्याने सिलिंडर गुदामात निष्काळजीपणाने ठेवले हाेते. त्यामुळे गॅस गळती होऊन हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या अहवालाची प्रतीक्षा असल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
‘आम्हाला अग्निशमन दलाचा अहवाल मिळाल्यानंतरच हा प्रकार नेमका कशामुळे घडला हे उघड होईल. त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल’, अशी माहिती वर्सोवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिराज इनामदार यांनी दिली. दरम्यान, या सिलिंडर स्फोटात चार जण जखमी झाले. होटी याला १५ फेब्रुवारी, २०२१पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
.........................