Join us

बार मालकांकडून पालांडे, शिंदे यांनी ४.८० कोटी घेतल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 7:46 AM

या प्रकरणातील मुख्य साक्षीदार सचिन वाझे, बारमालक जया शेट्टी व महेश शेट्टी यांच्या जबाबानुसार ३ महिन्यांत ४ कोटी ८० लाख रुपये पालांडे व शिंदे यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आल्याचे समोर आले आहे

जमीर काझीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : स्फोटक कार प्रकरणापूर्वीच्या तीन महिन्यांत तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांचे विश्वासू सहकारी व खासगी सचिव संजीव पालांडे व सहायक कुंदन शिंदे यांनी ४ कोटी ८० लाख रुपये हप्त्याच्या स्वरूपात मिळविले होते. तत्कालीन एपीआय सचिन वाझे याने ही रक्कम मुंबईतील बार मालकांकडून वसूल करून त्यांना दिल्याचा सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) संशय आहे. देशमुख यांच्या सूचनेनुसार हवालामार्फत ती रक्कम दिल्ली व तेथून परदेशात पाठविण्यात आली. दोघांना कोठडी मिळाल्याने त्याबाबत त्यांच्याकडे सविस्तर उलगडा केला जाईल, तर देशमुख यांच्याकडेही लवकरच चौकशी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

या प्रकरणातील मुख्य साक्षीदार सचिन वाझे, बारमालक जया शेट्टी व महेश शेट्टी यांच्या जबाबानुसार ३ महिन्यांत ४ कोटी ८० लाख रुपये पालांडे व शिंदे यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आल्याचे समोर आले आहे. ही रक्कम डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत मुंबई शहर व उपनगरातील ६० बारमालकांकडून वसूल करण्यात आली होती. अधिकाऱ्यांनी एनआयएच्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या वाझेचा तळोजा जेलमध्ये जाऊन जबाब नोंदविला होता. त्यातून आर्थिक देवाण-घेवाण झाल्याचे समोर आल्याचे त्यांनी ईडीला कळविले होते. त्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली होती. त्यामध्ये जमा केलेली रक्कम पहिल्यांदा मुंबईतून नागपूरला पाठविली जायची. तेथून दिल्लीला एका ट्रस्टच्या नावे जमा केली जायची. हवाल्यामार्फत हा व्यवहार होत असे, शिंदे सदस्य असलेल्या एका ट्रस्टमधूनही रक्कम काढून परदेशात वर्ग केली जात हाेती, असा संशय अधिकाऱ्यांना आहे. त्यासाठी देशमुख यांचे पुत्र सलील व ऋषिकेश देशमुख आणि त्याचे निकटवर्तीय विक्रम शर्मा यांच्या नावे असलेल्या विविध कंपन्यांच्या खात्यांचा वापर करण्यात आल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला.

बनावट कंपन्यांच्या खात्यावर निधी!हप्ता वसुलीतून मिळत असलेली रक्कम ही देशमुख यांचे पुत्र व निकटवर्तीयांच्या नावे असलेल्या विविध कंपन्यांच्या खात्यावर वर्ग केल्याचा संशय ईडीला आहे. सुमारे २४ कंपन्यांपैकी १५ हून अधिक कंपन्या केवळ कागदावरच अस्तित्वात असल्याचे समजते.

राजू भुजबळ यांचा जबाब  ईडीने नोंदवलामाजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत सक्तवसुली संचालनालय (ईडी) मुंबई पोलीस दलातील उपायुक्त राजेंद्र भुजबळ यांचा शनिवारी जबाब नोंदविला. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोप पत्रात भुजबळ यांचाही उल्लेख होता.

टॅग्स :अनिल देशमुखगुन्हेगारीपरम बीर सिंग