Join us

नाव न घेता अजित पवारांवर मोहित कंबोज यांचा निशाणा; काही वेळातच ट्विट डिलीट केले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 1:34 PM

गेल्या काही दिवसापासून उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे.

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसमधील नऊ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार काही दिवसात मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आता उघड-उघड ही मागणी केली आहे. आज मुंबईतील लालबागच्या राजाजवळ अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत या मागणीची एक चिठ्ठीही ठेवली. यावरुन आता भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विट केलं आणि काही वेळातच हे ट्विट डिलिटही केलं. 

"नागपूर पाण्यात बुडालंय आणि तुम्ही सिनेकलाकारांसोबत घरात उत्सव साजरा करताय"

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गेल्या काही दिवसापासून अजित पवार भविष्यातील राज्याचे मुख्यमंत्री असे पोस्टर्स लावले आहेत. तर आज मुंबईतील लालबागच्या राजाजवळही या आशयाची चिठ्ठी ठेवली. यावरुन आता पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाचा मुद्दा चर्चेत आला आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या ट्विटनेही उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. "मुख्यमंत्री होण्यासाठी ४५ नव्हे तर १४५ आमदार लागतात", असा टोला नाव न घेता मोहित कंबोज यांनी लगावला. 

या ट्विटची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. अजित पवार भाजपसोबत एका बाजुला महायुतीमध्ये सहभागी झाले आहेत. तर दुसरीकडे अगोदर आमदार गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसापूर्वी अजित पवार यांच्यावर टीका केली, आता भाजप नेते कंबोज यांनी टोला मुख्यमंत्रिपदावरुन टोला लगावला आहे. 

अजित पवारांनी आज सकाळी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळीच मुंबईतील प्रसिद्ध गणपती 'लालबागच्या राजा'चे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत पुत्र पार्थ पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेही उपस्थित आहेत. अजित पवार अनेकवेळा सकाळपासूनच राज्यात सुरु असलेल्या कामांचा आढावा घेताना दिसून येतात. त्याचप्रमाणे आज सकाळी त्यांनी सर्वप्रथम लालबागच्या राजाच दर्शन घेतलं.

पदाधिकाऱ्याच्या चिठ्ठीची रंगली चर्चा

अजित पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. त्यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी (अजित पवार गट) रणजीत नरोटे यांनी लालबागच्या राजाच्या चरणी एक चिठ्ठी अर्पण केली. या चिठ्ठीची चर्चा माध्यमांमध्ये रंगली आहे. या चिठ्ठीमध्ये ''हे लालबागच्या राजा, आमचे अजितदादा पवार लवकरात लवकर या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होऊ दे'', असं लिहिलं होतं. दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशा आशयाचे बॅनर्स ठिकठिकाणी लागले होते. अनेकांनी गणपतीच्या देखाव्यातून अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त करण्यात आली होती.

टॅग्स :मोहित कंबोज भारतीयअजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसभाजपा