Join us

'अभ्यासपूर्ण बोलायला राज ठाकरेंसारखा 'वाघ' लागतो', मेळाव्यावरुन मनसेचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2022 9:15 AM

मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी एका वाक्यात दोन्ही नेत्यांच्या भाषणावर टीका केली. 

मुंबई - शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या दोन्ही गटाचा दसरा मेळावा (Dasara Melava) दणक्यात झाला. शिवाजी पार्क आणि बीकेसी या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करण्यात आले. मात्र, दोन्हीही नेत्यांच्या भाषणात तेच ते मुद्दे घेण्यात आल्याची चर्चा आता रंगली आहे. ज्या पद्धतीने मेळाव्याचं उदात्तीकरण किंवा चर्चा होत होती, त्याला अनसरुन एकही नेत्याचे भाषण झाले नसल्याचे राजकीय विश्लेषक म्हणतात. उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थावरून केलेल्या टीका, आरोपांना एकनाथ शिंदे यांनी बीकेसीवरून प्रत्युत्तर दिले. या दोन्ही भाषणावर आता इतर राजकीय नेते प्रतिक्रिया देत आहेत. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी एका वाक्यात दोन्ही नेत्यांच्या भाषणावर टीका केली. 

उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणावरून मनसेकडून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली असून, दसरा मेळाव्यावरून निशाणा साधण्यात आला आहे. उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा सुरू होण्यापूर्वी उद्धव ठाकरेंची सभा ही टोमणे सभा, असा टोला मनसे नेते आणि प्रवक्ते गजानन काळे यांनी लगावला होता. त्यानंतर दसरा मेळावा झाल्यानंतर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. तर, मनसे आमदार राजू पाटील यांनीही ट्विट करुन एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यावर निशाणा साधला आहे. तसेच, भाषण ऐकावं तर राज ठाकरेंचंच असेही त्यांनी म्हटले. भाषणासाठी कोणाला कोणावरचा 'राग' लागतो, अभ्यासपूर्ण बोलायला राजसाहेबांसारखा 'वाघ' लागतो. राजसाहेब ते राजसाहेबच !, असे ट्विट आमदार राजू पाटील यांनी केले आहे. तसेच, बीकेसी तर केबीसी होता, असे म्हणत एकनाथ शिंदेंचं भाषण हे मनोरंजन असल्याचाही टोला त्यांनी लगावला. त्यासोबत खोके हा हॅशटॅगही वापरला आहे.  विचारही नाही आणि सोनंही नाही

उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर लगेचच ट्वीटरवरुन “नुसतीच ‘उणी’ ‘धुणी’ ‘नळ’ आणि ‘भांडण’; विचार ही नाही आणि सोनं ही नाही, असे ट्वीट देशपांडे यांनी केले. तसेच उद्धव ठाकरे यांच्या जुन्या मुलाखतीचा एक व्हिडिओ ट्विट करत संदीप देशपांडे यांनी, भूतकाळ कधीच पिच्छा सोडत नसतो. बरोबर ना उद्धवजी, असा सवाल करत, बोले जैसा चाले त्याची वंदावी पाऊले, असे म्हणत टोला लगावला आहे. या व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरेंना एका मुलाखतीत घराणेशाहीबद्दल प्रश्न विचारण्यात आला आहे. यावर उत्तर देताना, घराणेशाहीकडे आपण कोणत्या नजरेने पाहता, ते महत्त्वाचे आहे. जर कुटुंबातील कोणी सदस्य जबरदस्तीने जनतेवर लादला जात असेल, तर ती घराणेशाही ठरू शकते. जनतेने मान्य केले असेल, तर ती बाब वेगळी. आमचे सरकार आल्यावर माझ्या मुलाला मी सांगितले की, तू मुख्यमंत्री हो किंवा अमूक खात्याचा मंत्री हो, तर ती नक्कीच घराणेशाही आहे, असे उद्धव ठाकरेंनी उत्तर दिले आहे. 

टॅग्स :राज ठाकरेमनसेशिवसेनाएकनाथ शिंदे