Join us

दहिसर चेकनाक्याहून कलानगरला जाण्यासाठी लागतात दोन तास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2023 10:15 AM

खड्ड्यांमुळे होतेय कोंडी, विमान प्रवासी, रुग्णवाहिकेला बसतोय फटका

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पश्चिम उपनगरातील रहिवासी आणि वाहनचालक वाहतूककोंडीने बेजार झाले आहेत. कांदिवली, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरीत खड्ड्यांची रांगोळी झाली आहे. वाहनांच्या रोजच मारुतीच्या शेपटीप्रमाणे वाढत असलेल्या संख्येमुळे वाहतूक यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे. दहिसर चेक नाका ते कलानगर हे अंतर पार करायला वाहनांना किमान दीड ते दोन तास लागत आहेत. तर अनेकवेळा कोंडीमुळे विमानतळावर वेळेत पोहोचणे शक्य झाले नसल्याने प्रवाशांची विमाने चुकली आहेत. रुग्णवाहिकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागला आहे.

दहिसर चेक नाका, गोरेगाव उड्डाणपूल, आरे चेक नाका, गुंदवली, चकाला येथील गोल्ड सॉप्ट फॅक्टरी, पार्ले जंक्शन, सांताक्रुझ-वाकोला जंक्शन या विविध ठिकाणी निर्माण झालेल्या सततच्या अडथळ्यांमुळे गेल्या काही महिन्यांपासून पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीची स्थिती बिघडली आहे. या अडथळ्यांमुळे प्रदीर्घ कोंडी, प्रवासाचा कालावधी वाढत असल्याने  आणि प्रवासी आणि रहिवाशांना त्रास झाला आहे. या परिस्थितीचा केवळ नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर विपरीत परिणाम होत नाही, तर शहराच्या वाहतूक नेटवर्कच्या एकूण कार्यक्षमतेवरही याचा परिणाम झाला आहे.

मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या दहिसर चेकनाक्याजवळ सकाळ आणि संध्याकाळ २ ते ३ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. काही मिनिटांच्या प्रवासाला किमान ४०-५० मिनिटे लागतात. मुंबईत जाणाऱ्या रुग्णवाहिकांनाही जागा मिळत नाही. दहिसर टोल नाका बंद करून मुंबईकरांची सुटका करा.- राजेश पंड्या, सामाजिक कार्यकर्ते

वाहतूक अडथळ्याची मूळ कारणे ओळखण्यासाठी सखोल वाहतूक विश्लेषण करून ठोस उपाय तयार करणे. सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय वाढविणे आणि नागरिकांना खासगी वाहनांना पर्याय म्हणून त्यांचा वापर करण्यास प्रोत्साहित करणे. वाहन चालकांना  गर्दीची ठिकाणे टाळण्यास मदत करण्यासाठी रिअल-टाइम ट्रॅफिक मॉनिटरिंग आणि कम्युनिकेशन सिस्टीमची अंमलबजावणी करणे, सकाळी ८ ते ११ आणि संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत अवजड आणि मालवाहू वाहनांच्या हालचालींवर निर्बंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना करणे. - ॲड. गॉडफ्रे पिमेंटा, विश्वस्त, वॉचडॉग फाउंडेशन

टॅग्स :वाहतूक कोंडी