लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ग्रे झोन या युद्ध प्रणालीमध्ये राजकीय नेतृत्व, राजनैतिक अधिकारी हे परस्परांवर वरचढ होत आपल्या देशाचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत असतात. यामध्ये तंत्रज्ञानालाही समाविष्ट केले जाते आणि ते वापरले जाते. ही संकल्पना मोठी आहे. त्याद्वारे आपल्या शत्रूला कमकुवत करता येते. हे नकारात्मक पद्धतीने केले जात असले तरी देशांना आर्थिक मदत करणे ही सकारात्मक पद्धतीही वापरून अशी ग्रे झोन युद्ध प्रणाली वापरली जाते. चीन अशा बाबतीत निष्णात आहे. त्यामुळे वन चायना पॉलिसीला भारताने आता पूर्णपणे धुडकावण्याची गरज असून, चीनमुळे अनेक बाबतींत होणारी अदृश्य आक्रमणे लक्षात घेता चीनला भारताने स्पष्टपणे बजावण्याची वेळ आली आहे, असे मत निवृत्त लेफ्टनंट जनरल दुष्यंत सिंह यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरने रविवारी आयोजित केलेल्या ऑनलाइन मुलाखतीत ते बोलत होते. निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी ही मुलाखत घेतली.
ग्रे झोन वॉरफेअर या विषयावर ते पुढे म्हणाले, ग्रे झोन ही काही नवीन युद्ध प्रणाली नाही. हायब्रीड वॉर फेअर, सायबर वॉरफेअर, इन्फर्मेशन वॉरफेअर अशा विविध युद्ध प्रणालींना एकत्र करून तयार झालेली ही ग्रे झोन वॉरफेअर संकल्पना आहे. कारगील युद्ध सुरू झाले ग्रे झोनमध्ये मात्र ते संपले पारंपरिक युद्ध प्रणालीने. पाकिस्तानने नेहमीच ग्रे झोन युद्धप्रणालीचा वापर करून युद्धांना सुरुवात केली. भारताने ती प्रणाली बदलून पारंपरिक युद्ध प्रणालीत परावर्तीत करून पाकिस्तानचा पराभव केला.
चीनमध्ये कम्युनिस्ट राजवट आल्यानंतर त्यांनी भारतावर लक्ष केंद्रित केले आहे. भारत-चीन युद्धानंतर भारतीय लष्कर सशक्त होत आहे, हे लक्षात घेऊन आपल्या तंत्रात चीनने बदल केले आहेत. उत्तराखंडमध्ये झालेले हिमस्खलन, मुसळधार पावसामुळे झालेले नुकसान, अरुणाचलमध्ये ब्रह्मपुत्रेचे पाणी अचानक बंद होणे, मुंबईतील ग्रीड बंद पडणे यामागे चीनचा हात आहे, असे मानले जाते. याबद्दल सिंह म्हणाले की, पुरावे नसल्याने आपण आरोप करू शकत नाही, हीच या ग्रे युद्ध प्रणालीची खासियत आहे. २०४९ पर्यंत चीनला जागतिक शक्ती बनावयाचे असून भारत आणि अमेरिका हे त्यांच्या मार्गातील मोठे अडथळे आहेत. त्यांना म्हणूनच भारताला अनेक बाबतीत दूर ठेवायचे आहे. त्यादृष्टीने ते काम करीत असतात. ते करार वेळ मारून नेण्यासाठी करतात, त्यामुळे ते पाळत नसल्याचेही त्यांनी सांगितले.