Join us

पक्ष्यांसह प्राण्यांनाही उकाडा असह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 3:05 AM

मुंबई शहर व उपनगरातील उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले असतानाच, वाढत्या उष्णतेचा फटका पक्ष्यांनाही बसत आहे.

मुंबई : मुंबई शहर व उपनगरातील उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले असतानाच, वाढत्या उष्णतेचा फटका पक्ष्यांनाही बसत आहे. तीव्र तापमान सहन होत नसल्यामुळे आकाशात भरारी घेत असतानाच, पक्षी भोवळ येऊन जमिनीवर कोसळत आहेत. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा फटका दर दोन दिवसांनी एका पक्ष्याला बसत असल्याचे, प्लान्ट अँड अ‍ॅनिमल वेल्फेअर सोसायटीचे सचिव सुनिश कुंजू यांनी सांगितले.मानवी शरीराला घाम येत असल्यामुळे मनुष्याच्या शरीराचे तापमान नियंत्रित होते. मात्र, पक्ष्यांमध्ये घाम येण्याची प्रक्रिया नसते. पक्षी पंखाद्वारे तापमान नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतात. वातावरणात उष्णता जास्त प्रमाणात असल्यामुळे त्यांना उष्णता असह्य होते. कडक उन्हात पक्ष्यांना पिण्यासाठी थंड पाणी मिळाले नाही, तर त्यांना नाहक जीव गमवावा लागतो, असे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे अध्यक्ष कौस्तुभ दरवेस यांनी सांगितले.वाढत्या तापमानामुळे परिसरातील चिमणी, कावळा, कबूतर, घार, घुबड, पोपट अशा अनेक पक्ष्यांना उष्णतेचे चटके सहन करावे लागत आहेत. तीव्र तापमानामुळे काही पक्षी भोवळ येऊन जमिनीवर पडतात. जखमी अवस्थेत पडलेल्या पक्ष्यांना कुत्रे आणि मांजर शिकार बनवितात. मागील दोन महिन्यांपासून ६ कावळे, ५ कबुतरे, २ बगळे, ३ चिमण्या, २ घारी, १ घुबड या पक्ष्यांना उष्माघाताचा त्रास होत आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, असे कौस्तुभ दरवेस यांनी सांगितले.मुंबईमधील तीव्र तापमानाचा धोका घार पक्ष्याला होत आहे. घार पक्षी उंच आकाशात उडत असतो. सूर्याची प्रखर किरणे घारीला असह्य करतात. घुबड पक्ष्यालाही उष्णतेचा त्रास होत आहे, असे सुनिश कुंजू यांनी सांगितले.जंगलतोड, वाढती लोकसंख्या, वाढते सिमेंटचे जंगल यांचा सर्वांनाच फटका बसत आहे. झाडे तोडल्यामुळे पक्ष्यांची घरटी नष्ट होत आहेत. पाण्याचे क्षेत्र कमी होत असल्याने पक्ष्यांची पाण्याची तहान भागत नाही. त्यामुळे पक्ष्यांना इतरत्र आसरा शोधावा लागत आहे. इमारतीचे पत्र्यांचे शेड उन्हात गरम होत असल्याने येथे बसणाऱ्या पक्ष्यांना अधिक त्रास होतो.अशी घ्या काळजी...कार्यालयाबाहेर, घराच्या छतावर पक्ष्यांसाठी पुठ्ठ्यांचे घर बनवा.सावलीत मातीच्या भांड्यात पक्ष्यांसाठी पाणी ठेवा.पाळीव पक्षी आणि प्राणी यांचे लसीकरण करा.जमिनीवर जखमी अवस्थेत पक्षी आढळल्यास प्रथम पाणी शिंपडा. त्यानंतर, त्याला पाणी पाजून रुग्णालयात दाखल करा.कबूतरांवर उष्माघाताचा जास्त परिणामवातावरणातील वाढत्या उष्णतेचा सर्वात जास्त त्रास पक्ष्यांना होताना दिसून येतो. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी कबूतरखाने आहेत. त्यामुळे येथील कबूतरांवर उष्माघाताचा सर्वात जास्त परिणाम होतो. सर्व पक्ष्यांतील कबूतरांची टक्केवारी ७० ते ७५ असून इतर प्रजातीमधील पक्ष्यांची टक्केवारी २५ ते ३० आहे. यामध्ये घार, कोकीळ, सी-बर्ड यांसारख्या पक्ष्यांचा समावेश आहे. उष्माघाताचा परिणाम झालेल्या किंवा जमिनीवर कोसळलेल्या पक्ष्यांना घेऊन मुंबईकर येतात. पक्ष्यांना ग्लुकोज पाणी, रोग प्रतिकारात्मक औषध देण्यात येते. त्यानंतर आठवड्याभरात पक्षी आकाशात भरारी घेण्यास सक्षम होतो, अशी माहिती परळ येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाचे सचिव जे. सी. खन्ना यांनी दिली.पाळल्या जाणाºया कुत्र्यांना व मांजरांना वाढत्या उष्णतेचा त्रास सहन करावा लागतो. घरात एसीच्या थंड वातावरणात या प्राण्यांचा वावर असतो. अशातच त्यांना लगेच बाहेर फिरायला नेले असता त्यांना वाढत्या उष्णतेचा त्रास सहन करावा लागतो. उष्माघाताचा परिणाम या प्राण्यांवर होतो. वाढत्या उष्णतेमुळे प्रतिदिन १० ते १५ कुत्र्यांसह ५ ते ८ मांजरांवर उपचार केले जातात. घोड्यांनादेखील उष्माघाताचा परिणाम होऊन रक्तदाब वाढतो. त्यामुळे घोड्यांच्या नाकातून रक्तस्राव होतो. बैल, म्हैस, गाय या प्राण्यांकडून तीव्र उन्हामध्ये काम करून घेता कामा नये.कुत्रा, मांजर पाळले असेल तर उन्हाळ्याच्या दिवसात त्यांची काळजी घेतली पाहिजे. कुत्रा आणि मांजर यांना सकाळी किंवा संध्याकाळी फिरायला न्यावे. प्राण्यांचा खाण्याच्या वेळा पाळून आवश्यकतेनुसार त्यांना खाण्यास द्यावे. उन्हाळ्याच्या वातावरणात कुत्र्यांचा आणि मांजराचा आहार शाकाहरी ठेवणे आवश्यक आहे. लस्सी, दही यासारखे पदार्थ त्यांच्या आहारात ठेवावेत. मांसाहार अगदी कमी प्रमाणात द्यावे. स्वच्छ व शुद्ध पाणी वेळेवर देणे. प्राण्यांना कोणताही आजार झाला असता, त्यांना दवाखान्यात दाखल करावे, जेणेकरून लवकरात लवकर आजार बरा होईल.हिरवे जंगल कमी करून सिमेंटचे जंगल वाढत आहे. त्यामुळे त्याचा अप्रत्यक्षरीत्या परिणाम मनुष्यासह पक्षी व प्राण्यांवर होत आहे. गरम हवेमुळे आणि तीव्र तापमानामुळे महिन्याभरात ३०० ते ३५० पक्षी उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले जातात. यामध्ये अनेक प्रजातींचे पक्षी असून जास्त करून कबूतरांचा समावेश आहे. घार, कोकीळ, पोपट यांचाही या पक्ष्यांमध्ये समावेश असतो.