देशात गोरखपूरसारख्या घटना घडणं दुर्दैवी, अरुण जेटलींनी व्यक्त केली खंत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2017 05:44 PM2017-08-20T17:44:55+5:302017-08-20T17:45:04+5:30
देशात गोरखपूरसारख्या घटना घडणं हे दुर्दैव आहे. अशा लाजिरवाण्या घटना घडायला नकोत, असं वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केलं
उत्तर प्रदेश, दि. 20 - देशात गोरखपूरसारख्या घटना घडणं हे दुर्दैव आहे. अशा लाजिरवाण्या घटना घडायला नकोत, असं वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केलं आहे. असे असताना अरुण जेटलींनी एक प्रकारे उत्तर प्रदेशमधील योगी सरकारवरच टीका केली आहे. न्यू इंडिया घडवण्यासाठी अशा घटना टाळण्याची गरज आहे, असं मतही त्यांनी व्यक्त केलं. मुंबईत भाजपाच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. फुटीरतावाद्यांची आर्थिक कोंडी केल्यामुळे जम्मू-काश्मीरमधील हिंसाचारही कमी झाल्याचा त्यांनी दावा केला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी बाबा राघवदास मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये 105 जणांचे मृत्यू झाले होते. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे ऑक्सिजन पुरवठ्याअभावी अनेकांचा मृत्यू झाल्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा करणारी कंपनी पुष्पा सेल्स प्रायव्हेट लिमिटेडदेखील वादाच्या भोव-यात सापडली आहे. गुरुवार आणि शुक्रवारी 10 जणांचे मृत्यू झाल्याचे हॉस्पिटल प्रशासनानेही मान्य केले आहे. ऑगस्टरच्या दुस-या आठवड्यात 30 बालकांचे मृत्यू झाल्यावर असे घडले नाही, असे सरकार सांगत होते. नंतर आकडा 7 आहे, असे मान्य केले. नंतर संख्या 63 वरून वाढत गेली आणि आता ती 105 झाली.
दरम्यान, बाबा राघवदास मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या या दुर्घटनेप्रकरणी मानवाधिकार आयोगाने उत्तर प्रदेश सरकारला नोटीस बजावत अहवाल मागवला आहे. त्यानुसार येत्या चार आठवड्यांमध्ये उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने या प्रकरणी स्पष्टीकरण द्यावे, असे मानवाधिकार आयोगाने बजावले आहे.
आयोगाने या प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारला नोटीस बजावताना या प्रकरणी आतापर्यंत काय कारवाई केली आहे. तसेच पीडितांना काय मदत केली आहे याची माहिती मागवली आहे. दरम्यान, या प्रकरणी दखल घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र ही याचिका फेटाळून लावत अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा सल्ला न्यायाधिशांनी याचिकाकर्त्याला दिला.
वाचा आणखी बातम्या
(गोरखपूर घटनेतील बळींची संख्या 63, BRD कॉलेजच्या मुख्याध्यापकांवर निलंबनाची कारवाई)
(गोरखपूरच्या इस्पितळातील मुलांचा मृत्यू म्हणजे सामुदायिक बालहत्याकांडच - उद्धव ठाकरे)
(अशा दुर्घटना होत असतात, गोरखपूर बालमृत्यूकांडावर अमित शाहांचं बेजबाबदार वक्तव्य)
गोरखपूरच्या सरकारी बाबा राघवदास मेडिकल कॉलेज -हॉस्पिटलमध्ये ६३ हून अधिक बालकांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले होते. त्यात नवजात बालकांची संख्याही मोठी आहे. मृत्यू झालेल्या 17 नवजात बालकांपैकी बऱ्याच बालकांना जन्मताच फुफ्फुसात जंतूसंसर्ग झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखभालीची गरज होती. त्यानंतर ज्या डॉक्टरांनी त्यांना रुगालयात दाखल करण्याचा सल्ला दिला होता. त्यात त्यांनी या मुलांना नियमित ऑक्सिजनची आवश्यकता असल्याचे सांगितले होते. बालरोग विभागात ऑक्सिजनचा तुटवडा आणि संसर्ग, यामुळे हे मृत्यू झाल्याचे सांगितले जात असले, तरी हॉस्पिटल आणि जिल्हा प्रशासनाने हे आरोप फेटाळले आहेत