मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या अॅकॅडमी आॅफ थिएटर आर्टचे माजी संचालक योगेश सोमण यांना विद्यापीठ प्रशासनाने सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येणार असल्याचे संगितल्यावर अभाविप, आशिष शेलार यांच्यानंतर आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याचा निषेध दर्शविला आहे. महाराष्ट्राचे आराध्य आणि संपूर्ण देशाला ज्यांच्या वीरतेचा सार्थ अभिमान आहे, त्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत गौरवोद्गार काढल्याबद्दल एखाद्या अधिकाऱ्याला थेट सक्तीच्या रजेवर पाठविणे, हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्राला काळिमा फासणारा आहे, त्यामुळे यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालावे आणि त्यांच्यावर केलेली कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या थोर पुरुषांची थोरवी कुणी सांगायचीच नाही का, असा प्रश्न अशा घटनांमुळे उपस्थित होतो आहे. मुंबई विद्यापीठातील अॅकॅडमी आॅफ थिएटर आर्ट्सचे संचालक योगेश सोमण यांना या अजब मानहानीला सामोरे जावे लागले आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल योगेश सोमण यांनी गौरवोद्गार काढल्यानंतर त्यांच्याविरुद्ध काँग्रेस प्रणीत एनएसयूआय या संघटनेने आंदोलन केले आणि ते आंदोलन मागे घेण्यासाठी थेट योगेश सोमण यांनाच सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठ प्रशासनाने घेतला असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात वीर सावरकरांच्या विचारांवर निष्ठा असणारे मुख्यमंत्री असताना किमान असा प्रकार होणे अपेक्षित नाही. एवढेच नाहीतर, काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना धमक्यासुद्धा दिल्या आहेत. हा अन्यायकारक प्रकार तत्काळ थांबवावा आणि तसे निर्देश मुख्यमंत्र्यांनी मुंबई विद्यापीठाला द्यावेत. राजकीय दबावाला बळी न पडता कृपया यात लक्ष घालावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.